कोल्हापूर(प्रतिनिधी)- मराठा आरक्षण विषयी निर्णय घेण्यासाठी राज्य विधीमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन तातडीने बोलवा या मागणीसाठी कोल्हापुरात मराठा समाज आक्रमक बनला आहे. मराठा समाजातर्फे येथील छत्रपती शिवाजी चौक येथे शुक्रवारी (ता. २८ मे) सकाळपासून ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
विविध पक्ष, संघटनांच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शविली. आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. काळया फिती लावून आणि जोरदार घोषणा देत आंदोलक कार्यकर्त्यांनी लक्ष वेधून घेतले.
सकल मराठा समाजातर्फे आयोजित या ठिय्या आंदोलनाला सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, भाजप कार्यकारिणी सदस्य महेश जाधव राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, निवास साळोखे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, यांच्यासह विविध संघटना, पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.