कलंदर : अडगळ ते आकर्षण…

सकाळचे अकरा वाजले तरी उन्हाचे चटके वाटत होते. आफताबने हातगाडी बाजूच्या चिंचेच्या झाडाखाली लावली व जोरात “भंगारवाले’ म्हणून ओरडू लागला. बाजूच्या एका जुन्या घरातून आवाज आल्यामुळे तो तिकडे गेला व पाच-दहा मिनिटे झाली असतील येताना एक जुना ट्रान्झिस्टर घेऊन आला व हातगाडीवरील जुन्या रेडिओच्या बाजूला ठेवून हातगाडी ढकलू लागला.  त्या ट्रान्झिस्टरला पाहतात रेडिओ कुत्सित नजरेने त्याकडे पाहू लागला.

रेडिओ : काय रे, शेवटी आलास ना माझ्या लायनीत?
ट्रान्झिस्टर : हो रे बाबा, काय करणार आता जमानाच बदलला आहे.
रेडिओ : हो पण, आमची जागा घेताना कशी तुला मजा वाटत होती त्यावेळी?
ट्रान्झिस्टर : खरं आहे, पण शेवटी आम्हालाही बदलणारे आले ना?

रेडिओ : बरोबर आहे, मला माझ्या मालकांनी 1962 साली खरेदी केले होते. वरती नावही आहे त्यांचे.
ट्रान्झिस्टर : मला माझ्या मालकाने 1973 साली खरेदी केले होते. त्यांचेही नाव आहे माझ्यावर.
रेडिओ : पण काय मजा होती त्या काळी. अरे क्रिकेटची कॉमेंट्री ऐकायला बालगोपाळ माझ्या बाजूला बसायचे. ऑस्ट्रेलियाची मॅच तर सकाळीच असायची.

ट्रान्झिस्टर : होय रे आणि बिनाका गीतमाला सुरू झाली की सारे कुटुंब व शेजारपाजारचे माझ्याभोवती जमा होत असत. पुढे मग पॅकेट ट्रान्झिस्टर आले. मग, वॉकमन काय, आता मोबाइल काय सगळेच बदलत चालले आहे. मी सोनी कंपनीचा आहे.

रेडिओ : मी नॅशनल एको. इतरही अनेक कार्यक्रम बातम्या, शेतीचे कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम, नाट्यसंगीत सर्वजण आवर्जून ऐकायचे बीबीसीच्या बातम्यांचा वेगळाच ठसका असे. त्या वेळेला आपल्या वापराचे एक लायसन्स होते व वार्षिक फी पोस्टात जाऊन भरावी लागे, हे लोकांना सांगूनही पटणार नाही.
ट्रान्झिस्टर : आता आपले पुढे काय? तुला भंगारवाल्यांनी कितीला घेतला रे? मला पंचवीसला.
रेडिओ : मला पन्नासला, म्हणजे हा आपल्याला काही असा सहज फेकून देणार नाही. बघूया काय नशिबात आहे ते?

आफताब पुढे काही वस्तू गोळा करत करत चहा पिण्यासाठी साडेचारच्या आसपास टपरीवर थांबतो. गाडी बाजूला लावतो. इतक्‍यात एक मारुती गाडी बाजूला उभी राहते व त्यातून एक साठीचे गृहस्थ उतरतात. ते भंगार वाल्याला विचारतात रेडिओ व ट्रान्झिस्टरची किंमत व दोघांचे 150 देईन म्हणतात. आफताबही लगेच डबल रक्‍कम मिळते पाहून देऊन टाकतो. कुलकर्णी स्वत: इलेक्‍ट्रॉनिक इंजिनिअर व जुन्या रेडिओची हौस असणारे. त्यांच्या घरी येताच दोन्ही वस्तूंची साफसफाई होते. ट्रान्झिस्टर तर लगेचच चालू होतो, थोडी खरखर असते. दोघांनाही पहिल्या मजल्यावरील त्यांच्या संग्रहालयात ठेवून कुलकर्णी पती-पत्नी खाली येतात. रेडिओ व ट्रान्झिस्टर एकमेकांना शुभेच्छा देतात. कारण आता ते दोघेही चांगल्या ठिकाणी आलेले असतात. आजूबाजूला साधारण पन्नासेक वेगवेगळे रेडिओ व ट्रान्झिस्टर असतात जे त्यांचे ओरडून स्वागत करतात. रेडिओ व ट्रान्झिस्टर या दोघांचाही वनवास संपून ते दोघेही त्यांच्या प्रमाणे असणाऱ्या सीनिअर सिटीझन्सच्या आनंदी समूहात सामावले जातात.

-उत्तम पिंगळे

 

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.