पीडितेशी लग्न केल्यास बलात्काऱ्यास शिक्षेत दिलासा… (भाग-१)

लग्नाच्या आमिषाने वारंवार बलात्कार केला. मात्र, लग्न करण्यास नकार दिला तर अपराध्याला शिक्षा तर होतेच मात्र जर त्या पीडितेशी त्याने लग्न केले तर खटल्यादरम्यान भोगलेली शिक्षा एकूण शिक्षेतून कमी होऊ शकते, असा निकाल कलकत्ता उच्च न्यायालयाने दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी 26 जुलै 2018 ला न्या. आशा अरोरा यांच्या खंडपीठाने हबीबर रहमान विरुद्ध पश्‍चिम बंगाल राज्य या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निकालांचा संदर्भ देत हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सदर निकालात न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा संदर्भ दिला असला तरी तीन वर्षांपूर्वी न्या. दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने स्टेट ऑफ मध्य प्रदेश विरुद्ध मदनलालच्या खटल्यात बलात्काराचा आरोप हा कुणा एका विरुद्धचा गुन्हा नसून तो सर्व समाजाच्या विरुद्ध आहे, त्यामुळे त्यात तडजोड करणे शक्य नाही. झालेल्या शिक्षेतून खटल्यादरम्यान भोगलेली शिक्षा कमी करता येणार नाही असे सांगितले होते. त्यासाठी शिंभु व इतर विरुद्ध हरियाणा राज्य या खटल्यात तीन न्यायाधीशांच्या खंडपीठांनी दिलेल्या निकालांचा संदर्भ न्या. मिश्रा यांच्या खंडपीठाने दिला होता. त्यामुळे खटल्यादरम्यान झालेली शिक्षा एकूण शिक्षेतून कमी करायची का नाही? हा संभ्रम निर्माण झाला आहे. कारण कलकत्ता उच्च न्यायालयाने 26 जुलै 2018 रोजी दिलेल्या निकालात सर्वोच्च न्यायालयाच्या बलदेव सिंग विरुद्ध पंजाब राज्य व रवींद्र सिंग विरुद्ध मध्य प्रदेश या खटल्याचा संदर्भ दिला आहे. मात्र, तीन वर्षांपूर्वीच हे निकाल त्या खटल्याच्या वेगळेपणामुळे दिले असून भविष्यात बंधनकारक नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मदनलालच्या खटल्यात सांगितले आहे.

हबीबर रहमान विरुद्ध पश्चिम बंगाल या खटल्यात आरोपीने मुलीचे आई-वडील घरात नसताना 13 वर्षांच्या मुलीवर जबरदस्ती केली होती. ती ओरडत असताना तिच्या तोंडावर रुमाल दाबून मी तुझ्याबरोबर लग्न करणार आहे, असे सांगितले. नंतर वर्षभर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. एक वर्षानंतर तिला लग्नाला नकार दिल्यानंतर तिने घडलेला प्रकार आई-वडील व ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य, यांना सांगितला. त्यानंतर संबंधित आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशला तक्रार दिली गेली. सर्व मेडिकल सोपस्कार झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपपत्र दाखल झाल्यावर साक्षी पुरावे झाले. त्यामध्ये आरोपीने एक वर्ष फिर्याद उशिरा दिल्याचा, तसेच मुलीची संमती असल्याचा व मुलीने एक लाख वीस हजार रुपये मागून तडजोडीचा प्रयत्न केल्याचा, मुलगी अल्पवयीन नसल्याचा बचाव केला. मात्र, त्याने लग्नाचे आमिष दाखवल्याचे तसेच अल्पवयीन असल्याचे पुरावे समोर आल्याने कुणी मुलगी आपली इज्जत खोट्या तक्रारीसाठी धोक्यात घालणार नाही, असे सांगत झालेल्या साक्षीपुराव्यांच्या आधारे जिल्हा न्यायालयाने सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. दरम्यान, अपील कालावधीत त्या आरोपीने त्याच मुलीशी (पीडितेशी) लग्न केले. त्यांना दोन मुलेही झाली लग्नाचे प्रमाणपत्र, मुलांचे जन्म दाखले याबाबी न्यायालयापुढे अपिलात सादर केल्या गेल्या. त्या सर्व बाबींचा विचार करून तसेच घटनेला 16 वर्ष झाले आहेत. त्यामुळे विशेष बाब म्हणून तडजोड मान्य करून आरोपीला झालेल्या शिक्षेतून त्याने खटल्यादरम्यान भोगलेली शिक्षा वजा करण्याचा निकाल कलकत्ता उच्च न्यायालयाने दिला आहे. एकूणच या निकालाने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या व्यक्तीने जरी त्या मुलीबरोबर लग्न केले तरी शिक्षा मात्र कमी होणार नाही फक्त खटल्यादरम्यान भोगलेली शिक्षा एकूण शिक्षेतून कमी होऊ शकते, असे स्पष्ट झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पीडितेशी लग्न केल्यास बलात्काऱ्यास शिक्षेत दिलासा… (भाग-२)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)