कोलकता – पश्चिम बंगालचे शिक्षण राज्यमंत्री परेशचंद्र अधिकारी यांच्या शिक्षिका असणाऱ्या कन्येला शुक्रवारी कलकत्ता उच्च न्यायालयाने नोकरीतून बडतर्फ केले. तसेच, शिक्षिका म्हणून मिळालेल्या वेतनाची रक्कम परत करण्याचा आदेश दिला.
मंत्री अधिकारी यांच्या कन्या अंकिता 2018 या वर्षाच्या अखेरीस सरकारी अनुदानित शाळेत शिक्षिका म्हणून रूजू झाल्या. बंगाल शालेय सेवा आयोगाच्या शिफारसीवरून त्या राज्याच्या माध्यमिक शिक्षण मंडळाने अंकिता यांची नियुक्ती केली. त्या नियुक्तीला एका महिला उमेदवाराने याचिकेद्वारे आव्हान दिले. भ
रती परीक्षेत अंकिता यांच्यापेक्षा अधिक गुण मिळवूनही आपल्याला डावलण्यात आल्याची तक्रार याचिकेत करण्यात आली. त्या याचिकेची दखल घेऊन उच्च न्यायालयाने मंत्रिकन्येला नोकरीतून बडतर्फ केले. तसेच, त्यांना 41 महिन्यांच्या वेतनापोटी मिळालेली रक्कम दोन टप्प्यांत परत करण्याचा आदेश दिला. न्यायालयाने अंकिता यांच्या बडतर्फीमुळे रिक्त होणारे पद याचिकाकर्तीसाठी राखून ठेवण्यास सांगितले आहे.
मंत्रिकन्येच्या अवैध नियुक्ती प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश न्यायालयाने याआधीच दिले आहेत. त्यावरून सीबीआयने गुरूवारी गुन्हा दाखल केला. दरम्यान, मंत्री अधिकारी शुक्रवारी चौकशीसाठी येथील सीबीआय कार्यालयात हजर झाले.