पिंपरी – भर रस्त्यात कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या बर्थडे बॉय आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बर्थडे बॉयच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 5) रात्री दहा वाजता दापोडी गावात पीएमपीएमएल बस स्टॉप समोर घडली.
समीर सियाज बागसिराज (वय 20, रा. दापोडी), सोहेल शेख (रा. दापोडी) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी समीर याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस शिपाई सागर आनंद जाधव यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शनिवारी आरोपी सोहेल याचा वाढदिवस होता. दोघांनी मिळून लोखंडी कोयत्याने केक कापून हत्याराचे प्रदर्शन करत परिसरात दहशत पसरवली. यावरून बर्थडे बॉय सोहेल आणि मित्र समीर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असाच प्रकार बालाजीनगर, भोसरी येथे दोन महिन्यांपूर्वी घडला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वायरलेसवरून एमआयडीसी पोलिसांची कानउघाडणी केली होती.
आरोपींच्या विरोधात कारवाई करताना जास्तीत जास्त शिक्षा होईल, अशी कलमे लावण्यास सांगितले होते. तसेच यापुढील काळात शहरात रस्त्यावर वाढदिवस साजरे होता कामा नये, तसेच तलवार, कोयते अशा घातक हत्याराने केक कापण्याचे प्रकार खपवून घेणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार पोलिसांना वेळीच कारवाई करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या होत्या.