नवी दिल्ली – केर्न कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आज अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कर विभागाने या कंपनी कडून 10,247 कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे. या विरोधात केर्न कंपनीने आंतरराष्ट्रीय लवादात खटला जिंकला आहे.
ही रक्कम परत मिळावी याकरिता कंपनीने अमेरिका, ब्रिटन इत्यादी देशातील न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिमॉन थॉमसन यांनी अर्थमंत्री अर्थ सचिव अजय भूषण पांडे यांच्याशी चर्चा केली. मात्र चर्चेचा तपशील सांगण्यास नकार दिला. आगामी काळातही ही चर्चा चालू राहणार असल्याचे सांगितले जाते.
भारत सरकारच्या आणि भारतातील सरकारी कंपन्यांच्या ज्या देशात मालमत्ता आहेत त्या देशांमध्ये अशा याचिका दाखल करून या मालमत्तांच्या माध्यमातून रक्कम मिळविण्यासाठी केर्न कंपनी प्रयत्न करीत आहे. केर्न कंपनीत सर्वसामान्य गुंतवणूकदाराबरोबरच जागतिक वित्तीय संस्थांची गुंतवणूक आहे.
गुंतवणूकदारांनी भारत सरकार कडून संबंधित पैसे वसूल करण्यासाठी तगादा लावलेला आहे. केर्न कंपनीने भारतातील कंपन्यांची फेररचना 2006-07 मध्ये केली होती. यावर भारत सरकारने प्राप्ती कर कायद्यात दुरुस्ती करून नंतर 10,247 कोटी रुपयांचा कर लावला होता. याला केर्न कंपनीने जागतिक लवादात आव्हान दिले होते.