काहूर

“सरपंच, अजून किती यळ ताटकळत बसायचं?’ वडाखाली जमलेल्या गावकऱ्यांच्या घोळक्‍यातून आवाज आला. सरपंचाने बाजूला पडलेली काडी उचलली आणि कान टोकरत, “नाम्या, लई बी बॅरिस्टर असल्यावानी आव आणू नगस. भादरायचंच काम करतूस म्हणून तरी बरंय.’ “सरपंच, दुकानात गिऱ्हाईक खोळंबल्यात. त्यात तुमचं पोरगं पण हाय. झालंच तर सांच्याला तुमची म्हस; चंद्रीला पण भादरायचंय. यात्रेत कसं रुबाबदार दिसल.’ “कोण? चंद्री!’ सरपंचाच्या प्रश्‍नावर गावकऱ्यांचा एकच हशा पिकला. “सरपंच, तुमचं पोरगं!’ तेवढ्यात फटफटीचा आवाज आला. “त्ये बगा, आलं सर्जेराव पाटील. नाम्या, पळत जा अन आफिसातनं खुर्ची घिऊन य.’ “ह्या सरपंचाची म्या एकदा चांगलीच भादरून काढणारंय; बिनपाण्याची!’ गण्याच्या कानात कुजबुजत नाम्या खुर्ची आणायला गेला.

“आरं, जरा फडकं मारून आणायची न्हवं.’ म्हणत सरपंचाने नाम्याच्या खांद्यावरचा गमजा घेत स्वतःच खुर्ची झटकल्यासारखी केली. पाटील खुर्चीत बसले आणि खिशातून अडकित्ता व सुपारी बाहेर काढली. तेवढ्यात लाळघोट्या सरपंचानं त्यांच्या हातातील अडकित्ता-सुपारी घेत,”पाटील, म्या देतु कातरून.’ पाटलानं उगाच आपल्या डोक्‍यावरची टोपी सरळ ठेवल्यासारखी करत गावकऱ्यांकडं एक कटाक्ष टाकला. “ही घ्या.’ पाटलाच्या हातावर सुपारी देताना; आपल्या हाताच्या पंजात दाबून धरलेली थोडी सुपारी सरपंचाने स्वतःच्या तोंडात कोंबली. पाटलानं तोंडातला सुपारीचा बुकना चघळत, “बरं मंडळी, सालाबादपरमानं येत्या पुनवंला गावची यात्रा हाय. तवा आज आपण त्याचं मॅनेजमेंट करायला हिथं जमलेलो हाव. तर सुरुवातीला देवीच्या मंदिराची रंगरंगोटी करून घेऊ. आवंदा पाच किलोचा चांदीचा कळस आमच्या सवताच्या पैशातनं मंदिरावर बसवणार हाव.’ पाटलाने घोषणा करताच गावकऱ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. मिशीला पीळ देत पाटील बोलू लागले, “गावच्या तरुण कार्यकर्त्यांनी उद्यापासनं वर्गणी गोळा करायचं काम इस्टार्ट करायचंय.

सरपंच, तुमि त्ये हरिनाम सप्त्याला आजूबाजूच्या गावातल्या समद्या महाराजांना सांगावा धाडा.’ “व्हय पाटील.’ “बैलगाडा शर्यतीचं मॅनेजमेंट विकास तरुण मंडळ करत्याल. हायती का त्या मंडळातली पोरं?’ तसा नाम्या उठून उभा राहिला. “पाटील, म्याच हाय प्रमुख.’ “दोन दिसात बॅनर छापून गावागावात लावून टाका.’ “पाटील म्या काय म्हंतु, आवंदा फॅशन शो पण चालू केला असता.’ पाटील बुचकळ्यात पडले. “काय असतंय त्ये?’ नाम्या आपल्या शर्टाची भाइ मागं सारत, “टीवीत नसतंय का त्ये; बाया फॅशनेबल लुगडं घालून चालत्यात अन्‌ मंग त्यातून एक सुंदर बाई निवडत्यात. तसंच…’ नाम्या पुढं काही बोलायच्या आत गावकऱ्यांनी एका दमात, “व्हय व्हय. फॅशन शो करूच आवंदा.’ म्हणत शिट्ट्या मारायला सुरुवात केली. “ये गण्या, किश्‍या आरं आदी ऐका तरी म्या काय म्हंतुय. बाळ्या, तुज्या म्हाताऱ्याला आवर. तोंडात एक दात नाही; पर बाईचं नाव काढलं की तोंड इचकून हसायला लागलंय.

हम्म, तर म्या काय म्हणत व्हतो पाटील; तसंच आपण आपल्या गावातील गायी-म्हशींचा फॅशन शो ठेवू. समद्यांनी आपापल्या गायी-म्हशींना नटवून आणायचं, त्यांना घिऊन पिंपळाच्या पाराला दोनेक राउंड मारायचं; अन्‌ शेवटी जाताजाता पुनंदा मागं वळून बगायचं. फकस्त म्हशीनं वा गायीनं!’ “फकस्त’ शब्दावर जोर देत नाम्याची नियमावली शेवटाकडं आली होती. “अन्‌ मंग या स्पर्धेत ज्ये कुणी परीक्षक असत्याल; त्यांनी एक देखणी म्हस नायतर गाय निवडायची. कशी वाटली आपली कल्पना.’ नाम्याचं बोलणं ऐकून सगळे गावकरी मोठमोठ्याने हसू लागले. पाटील सरपंचाच्या तोंडाकडे पाहून, “वाईट न्हाय. करू आवंदा फॅशन शो. पर त्ये परीक्षक म्हंजी?’ तेवढ्यात घोळक्‍यातून कुणाचातरी आवाज आला. “जज्ज.’ “ओके. ओके. नाम्या, जज्ज म्हण की. जरा दोन-चार बुकं जास्त शिकला असता तर इंग्रजी बोलता आलं असतं. बस खाली.’ “फॅशन शो इंग्रजी न्हाय तर काय मराठी शब्द हाय व्हय? आलंय मोट्ट मला सांगणारं!’ तोंडातल्या तोंडात पुटपुटत नाम्या खाली बसला.

“साळंसमोरच्या ग्राउन्डवर मातीचा हौदा करा. आवंदा कुस्तीचा इनाम रोख रक्‍कम ईस हजार हाय. तवा आपल्या तालमीतल्या मल्लांना कसून तयारीला लागा म्हणावं. उंद्या मी अन सरपंच तालुक्‍याला जातो अन तमाशाची सुपारी देऊन येतो. बरं, अजून काय राहिलंय?’ गावकऱ्यांची कुजबूज चालू झाली. तेवढ्यात सरपंचाने ऑर्डर सोडली. “नाम्या, गोकुळच्या टपरीवरनं 4-5 चहा आन.’ नाम्या तोंड वेडंवाकडं करत चहा आणायला गेला. बशीतल्या चहाचा फुरका ओढताना त्यात बुडालेल्या मिशीवरून मध्येच पाटलाची जीभ फिरत होती. चहा पिऊन झाला आणि पुन्हा सरपंचाने अडकित्त्यात सुपारी धरली. घोळक्‍यातून आवाज आला. “पाटील, एक महत्त्वाचं काम ऱ्हाईलं.’ “कोणतं?’ “गावात लई घाण झालीय. गटारी तुंबल्यात, उखंड्यावर तर कचऱ्याचा ढीगच लागलाय अन परसाकडं तर जायची सोयच नाय ऱ्हायली. नाक चिमटीत धरून जावं लागतंय!’ “सरपंच, टेकाडावर त्यो म्हाद्या हाय न्हवं; त्याला उंद्या वाड्यावर घिऊन या.’ “बरं मंडळी, मिटिंग संपली. तुमि कामाला लागा. त्या घाणीची इल्हेवाट कशी लावायची म्या बगतो.’
दुसऱ्या दिवशी, “आरं ये म्हाद्या, तू हिथं दगडं फोडत बसलाय अन म्या तुज्या घरला जाऊन आलो.’ सरपंचाचा आवाज ऐकताच हातातला हातोडा खाली टाकून देत म्हाद्याने हात जोडले.

“तुला पाटलानं वाड्यावर बोलिवलंय. चल बिगीबिगी.’ म्हाद्या सरपंचाबरोबर वाड्यावर गेला. पाटील झोपाळ्यावर बसून नाश्‍ता करत होते. “सरपंच या. बसा.’ सरपंच पाटलाच्या बाजूला जाऊन बसले. अंगणातल्या एका कोपऱ्यात म्हाद्या आपल्या अंगाचं मुटकुळं करून खाली बसला. “अहो, ऐकलंत का? सरपंचाला पोहे आना.’ पाटील पोहे खाताखाता म्हाद्याला खालून वरपर्यंत न्ह्याहाळात होते. सहा-साडेसहा फूट म्हाद्याच्या अंगावर ठिगळ लावून नेसलेले धोतर आणि ठिकठिकाणी फाटलेला सदरा होता. डोक्‍यावर कळकटलेला फेटा आणि चेहऱ्यावर त्याहून अधिक कळकटलेली दाढी. डोळे खोल गेलेले आणि गालफाड बसलेलं. “गावची यात्रा हाय. ठावय न्हवं?’ “व्हय.’ “गावात लई घाण झालीय. उखंडे, गटार अन परसाकडलं साफ करून घ्ये.’ “पाटील, खडी फोडायचं काम चालू हाय.’ पाटलानं चुळ भरली आणि हात धुऊन घेतले. “त्ये राहू दे. कंत्राटदार माज्या गष्टनीतला हाय. त्याला काय सांगायचं त्ये मी बगतु.’ “अहो, अलमारीतले दोन हजार रुपये घिऊन या. अन तुमि वापरत नसलेली दोन-चार लुगडी पण आना.’ थोड्यावेळाने पाटलीणबाई पैसे आणि लुगडी घेऊन बाहेर आल्या. “म्हाद्या, येशीभायर ऱ्हायला दिलं त्ये इसरलास व्हय? अन ह्याच गावची येस न्हवं ती. तवा आदी गाव इम्पार्टन्ट. दोन दिसात गाव चकाचक झालं पायजे. ह्ये घ्ये.’ असं म्हणून पाटलानं पैसे आणि लुगडी म्हाद्याला दिली. “अहो, पोहे उरले असतील तर टाकून देण्यापसूर द्या ह्याला.’ त्या अन्नालाही मोक्ष मिळाला असावा. उखंड्याच्या पोटात न जाता ते आज कुणाच्यातरी पोटाची भूक भागवत होतं!

“मंगले, लहू कुटंय?’ “त्यो गेला साळत.’ “म्या आलूच त्याला घिऊन, तवर तू खालची आळी साफ कर.’ म्हाद्या आपल्या पोराला आणायला शाळेत गेला. वर्गात गुरुजी मुलांना शिकवत होते. “मुलांनो, माणसाने माणसाकडे माणूस म्हणूनच बघावे. जातीपातीच्या भिंतीपलीकडलं जग खूप सुंदर आणि नितळ आहे.’ म्हाद्या वर्गाबाहेर उभा राहून, “गुरुजी नमस्कार.’ “म्हाद्या तू! आत ये.’ “न्हाई नगं. लहूला न्यायला आलतू.’ “काही काम आहे का?’ “व्हय.’ “लहू, जा तू. आणि आता 4-5 दिवस यात्रेची सुट्टी आहे.’ लहू आपल्या आई-बापाबरोबर हातात खराटा आणि घमेलं घेऊन गाव साफ करत होता. त्याला त्या कामाची कसलीच लाज वाटत नव्हती. मात्र तुंबलेल्या गटारातली घाण काढताना त्याच्या मनात एकच प्रश्‍न तुंबला होता; “मी’च का? पण त्याला त्याचं उत्तर सापडत नव्हतं. फावडं धुवायला ज्या चरवीतून पाणी ओतलं जायचं; त्याच चरवीतून बापाच्या ओंजळीत पाणी पडताना पाहून त्याच्या घशाची कोरड आतला आवंढा गिळूनच भागत होती…!

बघताबघता गाव स्वच्छ झालं. रस्ते सडा-रांगोळ्यांनी सजले. दिव्यांच्या रोषणाईने घरं उजळली. रस्त्याच्या दुतर्फा खेळण्यांची दुकानं थाटली होती. टाळ-मृदुंगाच्या गजरात पालखी नाचत होती. रहाटपाळने आकाशाला भिडत होते. उंच टेकाडावर बसलेल्या लहूचं मन त्या रहाटपाळण्याला लटकून स्वतःच्याच एका वेगळ्या आकाशात स्वच्छंद होऊन गिरक्‍या घेत होतं. चंद्राच्या लख्ख प्रकाशात मंदिरावरचा कळस चकाकत होता. लहू एकटक त्या कळसाकडं पाहत होता. अचानक वीज कडाडल्याचा आवाज झाला आणि लहू भानावर आला. क्षणात चंद्राला काळ्या ढगांनी घेरलं आणि मुसळधार पाऊस चालू झाला. छपरावर पडणाऱ्या टपोऱ्या थेंबांच्या आवाजातून कानोसा घेताना हाका ऐकू आल्या. “धावा… पळा…धरण फुटलं… गावात पाणी शिरलं… देवीचा कोप झाला…’ म्हाद्या बाहेर आला. बघतो तर, धरणाचं पाणी गावात शिरलं होतं. लोक सैरावैरा धावत सुटले होते.

म्हाद्या जिवाच्या आकांतानं हातवारे करून ओरडत होता. “हिकडं या, टेकडीवर या.’ म्हाद्याच्या आवाजानं एक घोळका टेकडीच्या दिशेनं पळत सुटला. पाण्याची पातळी झपाट्यानं वाढत होती. होत्याचं पार नव्हतं झालं होतं. म्हाद्या हात देऊन लोकांना वर ओढत होता. “पाटील, हात द्या.’ भीतीनं पाटलाच्या शरीराचा थरकाप उडाला होता. एक पाऊल आता चालवत नव्हतं. म्हाद्यानं पाटलाला खांद्यावर उचललं आणि वर आणून सोडलं. लहू सुन्न होऊन फक्‍त बघत होता. त्याच्या मनात वेगळंच काहूर माजलं होतं. आज त्याच्या बापाच्या हाताला धरून वर येणाऱ्या माणसांत तो कुणालातरी शोधत होता! कदाचित तो एक “माणूस’ शोधत होता; जो त्याला सापडलाच नाही. त्याला पडलेल्या प्रश्‍नासारखा; त्याच्या मनातलं “काहूर’ कधी शमलंच नाही…!

अमोल भालेराव

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.