पुणे – दुकानाचे शटर उचकडून गल्लयातील 50 हजारांची रोकड आणि दहा हजारांची कॅडबरी चॉकलेट चोरणाऱ्या अमरसिंग जगरसिग टाक (वय 21, रा. गोसावी वस्ती, हडपसर) याला विमानतळ पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला दि. 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
याप्रकरणात त्याचा साथीदार लल्या (रा. रामटेकडी) याविरोधात गुन्हा दाखल आहे. ही घटना विमानगर परिसरातील एका दुकानात घडली. याबाबत सचिन विनोदराव बिजवे (वय 38, रा. चंदननगर) यांनी फिर्याद दिली आहे.
टाक हा घरफोडीचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार आहे. विमानतळ परिसरात त्याने यास्वरुपाचे आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास करायचा आहे.
तसेच, गुन्ह्यातील माल हस्तगत करायचा असून दुकानातील शटर उचकटण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे जप्त करायची असल्याचे सहाय्यक सरकारी वकील नितीन कोंघे यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.