केंद्राने केली कॅबिनेट समित्यांची फेररचना

राणेंचा गुंतवणूक व विकास समितीत समावेश

नवी दिल्ली – केंद्र सरकारने मंत्रिमंडळाची फेररचना केल्यानंतर आज कॅबिनेट समित्यांचीही नव्याने रचना केली आहे. त्यात स्मृती इराणी आणि भुपेंद्र यादव यांना महत्वाच्या समितीमध्ये स्थान मिळाले आहे. या दोघांची नियुक्ती राजकीय व्यवहार समितीत करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी हे स्वत: या समितीचे अध्यक्ष आहेत. 

संसदीय व्यवहार समितीमध्ये अर्जुन मुंडा, विरेंद्रकुमार, किरेन रिजीजु आणि अनुराग ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. सुरक्षेच्या विषयावरील कॅबिनेट समिती सर्वोच्च समिती मानली जाते त्यात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अमित शहा, राजनाथसिंह, निर्मला सीतारामन, एस जयशंकर हे या समितीचे सदस्य आहेत.

राजकीय व्यवहार समितीमधील अन्य सदस्यांमध्ये राजनाथसिंह, अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, नरेंद्रसिंह तोमर, पीयुष गोयल, प्रल्हाद जोशी, सर्वानंद सोनोवाल, गिरीराजसिंह, मुकेश मांडविया, यांचा समावेश आहे. रविशंकर प्रसाद आणि हर्षवर्धन यांना ते मंत्रिमंडळात नसल्याने यातून वगळण्यात आले आहेत.

आर्थिक व्यवहार समितीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान मोदींसह एकूण नऊ जण सदस्य आहेत. अर्जुन राम मेघवाल, व्ही मुरलीधरन यांची संसदीय व्यवहार समितीवर विशेष नियंत्रीत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांची गुंतवणूक आणि विकास समितीत नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत पंतप्रधान मोदींसह राजनाथसिंह, अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, पीयुष गोयल, ज्योतिरादित्य शिंदे, अश्‍विनी वैष्णव यांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.