कार्यकर्त्यांमध्ये नाराजी : पिंपरी, मावळच्या आमदारांना डावलले
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराला मंत्रीपदाने पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे. महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये पिंपरीतील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांना मंत्रीपदाची संधी मिळेल अशी अपेक्षा होता. ती फोल ठरली. विशेष म्हणजे प्रचंड मताधिक्याने विजयी झालेल्या सुनील शेळके यांनाही संधी देण्यात आलेली नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला आजपर्यंत एकदाही मंत्रीपद मिळालेले नाही. पूर्वीच्या हवेली मतदारसंघाचे नेतृत्त्व करणारे देहूगावचे दिवंगत नेते प्रा. रामकृष्ण मोरे यांनी राज्य मंत्रिमंडळात शिक्षणमंत्री म्हणून कामकाज केले. त्यांनी शहराचेही नेतृत्व केले होते. त्यानंतर अजित पवार यांनी देखील शहराचे नेतृत्व केले. परंतु, पिंपरी-चिंचवड शहरातून कोणीही राज्य मंत्रिमंडळात मंत्री झाले नाही.
मागील भाजप सरकारच्या काळात आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांना मंत्रिपद मिळण्याची सातत्याने चर्चा झाली. पिंपरी महापालिकेत भाजपची सत्ता आल्यास शहराला लाल दिवा देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता देखील आली. पण, मंत्रिपद काही मिळाले नाही. केवळ चर्चाच झाली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता जाऊन शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस महाविकास आघाडीची सत्ता आली.
महाविकास आघाडीच्या सरकारचा दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार झाला. या विस्तारात तीनही पक्षांच्या 36 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रीमंडळ विस्तारात पुण्यातून राष्ट्रवादीच्या तिघाजणांना संधी देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले होते. त्यामुळे पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे अथवा सुनील शेळके यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली आहे.
पुणे जिल्ह्यातून राष्ट्रवादीकडून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर, आंबेगावचे दिलीप वळसे पाटील यांनी कॅबिनेट तर इंदापूरचे दत्तात्रय भरणे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. परंतु मंत्रीपदापासून शहर पोरकेच राहिले.