चंदीगढ – आपल्या कुशल रणनीतीने 2017 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारे रणनीतीज्ञ प्रशांत किशोर हे त्या राज्यात पुन्हा एकदा कॉंग्रेससोबत आले आहेत. प्रशांत किशोर यांची राज्याचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला जाणार आहे.
स्वत: अमरिंदर सिंग यांनी एका ट्वीटद्वारे ही माहिती दिली असून पंजाबच्या जनतेच्या भल्यासाठी आम्ही एकत्र काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतही अमरिंदर सिंग यांना प्रशांत किशोर यांची चांगली मदत झाली होती. दहा वर्षे सत्तेतून बाहेर असलेल्या या राज्यात कॉंग्रेसला पुन्हा सत्तेवर आणण्यात आणि अमरिंदर यांचा ब्रॅंड प्रस्थापित करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. दरम्यान किशोर यांच्या नियुक्तीवर राज्य मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे.