कामशेत (वार्ताहर) – येथील आठवडे बाजारात आज गर्दी दिसून आली. अधून-मधून येणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडत होती. यामुळे बाजारात रेनकोट आणि छत्र्या सर्वत्र दिसत होत्या. वाढती गर्दी आणि पाऊस यामुळे दुपारनंतर वाहतूक कोंडी झाली होती.
या आठवडे बाजाराला कोबी, फ्लाॅवर आणि मिरचीच्या दरात झालेल्या वाढीचा ठसकाही जाणवत होता. मिरच्या महाग झाल्या असल्या तरी आवर्जून खरेदी केल्या जात होत्या.
सध्या भाजी मंडईत केवळ हिरव्या मिरचीचाच ठसका आहे. कांदा बटाटा, लसुण या सर्वांचे दर हे नियंत्रणात आहेत. मात्र, मिरचीने शंभरी गाठली आहे. घटत्या उत्पादनाबरोबर पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीचाही परिणाम या भाजीपाल्यांच्या दरावर झालेला आहे.
उन्हाळी हंगामात मिरचीचे उत्पादन मर्यादित क्षेत्रावरच घेतले होते. तर इतर राज्यातून मिरचीची होणारी आवक कमी झाल्यानेसुद्धा हिरव्या मिरचीच्या दरात वाढ होत आहे. परंतु इतर भाज्यांचे दर कमी झालेले दिसून आले.
उन्हाळ्यात आकाशाला भिडू पाहणारे लिंबू पावसाळ्यात सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. श्रावण महिना चालू झाल्याने पालेभाज्यांना मोठी मागणी वाढली आहे पण पालेभाज्यांचे भाव स्थिर आहे.
लिंबू ४० रुपये किलो
मागील तीन महिन्यात लिंबाच्या दराने उच्चांक गाठला होता. मार्च महिन्यापासूनच लिंबाचे भाव उडाले होते. दहा ते पंधरा रुपये नगाप्रमाणे लिंबू विकला गेला; परंतु जून महिन्याच्या सुरुवातीपासून लिंबाची आवक वाढली आहे.
त्यामुळे उन्हाळ्यात ४०० ते ४५० रुपये किलोप्रमाणे मिळणाऱ्या लिबांचा भाव सध्या ३० ते ४० रुपये किलोवर आला आहे.
बटाट्याची आवक घटली, कांद्याची वाढली
बटाट्याची आवक कमी होऊनसुद्धा बटाट्याचे दर स्थिर आहेत. मागील काही महिन्यांपासून बटाटा प्रति किलो २५ ते ३० रुपये दराने विक्री होत आहे. आजही बटाट्याचा दर कायमच आहे. कांदा बाजारात कांद्याची मोठी आवक होत आहे. आवक वाढली असली तरी मालाला हवा तसा उठाव मिळत नाही.
बाजारात ग्राहक नसल्याने बराच माल पडून आहे. त्यामुळे कांद्याचे दरही उतरले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला घाऊक बाजारात कांद्याचे दर २० ते २५ रुपये किलोपर्यंत होते. तर किरकोळमध्ये ते ३० ते ३ ३५ रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र, आता किरकोळ बाजारात कांदा १५ ते २० रुपये किलोच्या घरात आहे.
पावसाचा परिणाम
सध्या पावसाने चांगली हजेरी लावल्याचा थेट परिणाम पालेभाज्यांच्या दरावर झाला आहे. हिरव्या पालेभाज्यांची आवक चांगली होत आहे. त्यामुळे भाज्यांचे दरही कमी होऊ लागले आहेत. कोथींबिर आणि मेथीच्या दरात दुप्पट झाली आहे.
काही दिवसांपासून मेथीसह अन्य पालेभाज्याची आवक चांगली आहे. पावसाला चांगली सुरुवात झाल्याने पालेभाज्याची आवक चांगली आहे त्यामुळे दर कमी झाले त्याच सोबत रानभाज्या ही बाजारात येऊ लागल्या आहेत.