“सीएए’, “एनआरसी’ने केला संविधानावर हल्ला

सातारा – पंतप्रधानांनी कोणत्या विद्यापीठातून डिग्री घेतली ते मोदी सांगू शकत नाहीत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची. नोटाबंदीने अर्थव्यवस्थेवर तर आता “सीएए’, “एनआरसी’ने संविधानावर हल्ला केला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत केली.

श्री. चव्हाण म्हणाले, सीएए, एनआरसी या कायद्यांत मुलभूत बदल करून देशाच्या संविधानावर हल्ला केला आहे. शहा, मोदींमध्ये विसंगती आहे. मोदींना शहांनी खोटे पाडले आहे. लोकशाहीच्या निर्देशकांमध्ये भारत 41 स्थानावर होता. आता तो 51 स्थानावर घसरला आहे.’ आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संविधान असुरक्षित असल्याची भावना असल्याने सरकारने हा कायदा रद्द करावा.

अशी मागणी यावेळी त्यांनी केली. चव्हाण म्हणाले, “”केंद्रीय अर्थसंकल्प घोषित करण्यासाठी वेळापत्रक निश्‍चित केले जाते. अर्थमंत्री विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची बैठक घेतात. यावेळी पहिल्यांदाच या परंपरा खंडीत झाल्या. अर्थसंकल्पासाठी झालेल्या 13 बैठका नरेंद्र मोदी, अमित शहा यांनीच घेतल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना बैठकांना बोलविले नव्हते. त्यांची कामगिरी सुमार आहे, त्यांच्यावर विश्‍वास नसेल तर महिलेचा अवमान करण्यापेक्षा अर्थमंत्री बदलावा. भारताचे सध्याचे दरडोई उत्पन्न दोन हजार डॉलर आहे. ते दुप्पटीने वाढविले पाहिजे.

मोदींच्या नेतृत्वाखाली अर्थव्यवस्थेचा विकास ढासळला. माजी आर्थिक सल्लागार सुब्रह्मण्यम यांनी मोदी सरकार विकासदाराचे आकडे 2.5 टक्क्‌यांनी फुगवून सांगत आहे, असा आरोप केला आहे. त्यावरून हा विकासदर केवळ दोनच टक्के आहे, असे समोर येत आहे. आमच्या सरकारच्या काळात 2010-11 मध्ये हा विकासदर 10.8 टक्के होता.”श्री. चव्हाण म्हणाले, “”देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा वापर केला.

त्यांच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी वाढली. महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक वाढली नाही. मोठे पायाभूत प्रकल्प पूर्ण झाले नाहीत. नवीन एकही सार्वजनिक उद्योग राज्यात आला नाही. “मेक इन इंडिया’च्या केवळ जाहिराती झाल्या. गेल्या 45 वर्षात सर्वात जादा बेरोजगारी मोदी सरकारच्या काळात आली. महाराष्ट्रात तर कोणताच उद्योग आला नाही.

फडणवीसांनी विरोधी पक्ष संपविण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्टाचारी सरकार फडणवीसांचे होते. ते थांबविण्यासाठीच तीन पक्ष एकत्र आले.” 2014 च्या निवडणुकीनंतर भाजप अल्पमतात होते. त्यावेळी शिवसेनेबरोबर सरकार का झाले नाही, हा प्रश्‍न वेगळा आहे. त्यावेळी शिवसेनेबरोबर जाण्याची परिस्थिती नव्हती. त्यावेळी निर्णय घ्यायला हवा होता, हे आता वाटते, असे एका प्रश्‍नावर सांगून राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे श्री. चव्हाण यांन स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माझे चांगले जुळते, असेही त्यांनी सांगितले.

चर्चा करून जिल्हाध्यक्षांची निवड
स्थानिक कार्यकर्ते व प्रदेश पातळीवरील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून दीर्घकाळ रिक्त असणाऱ्या कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व इतर पदांच्या निवडी करण्यात येतील, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. कॉंग्रेस समिती कार्यालयात आज झालेल्या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.