पुणे : कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत मे-जुलै 2020 मध्ये होणारी चार्टर्ड अकाउंटंटस् अर्थात ‘सीए’ ची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा आता थेट नोव्हेंबरमध्ये होणार आहे, अशी माहिती ” इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंन्टट्स ऑफ इंडिया’तर्फे (आयसीएआय) देण्यात आली.
सीएची परीक्षा वर्षातून दोन वेळा म्हणजे मे आणि नोव्हेंबर महिन्यात घेतल्या जातात. “आयसीएआय’ने मे मधील परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी अर्ज देखील भरले. मात्र, लॉकडाऊनमुळे बहुतांश विद्यार्थी त्यांच्या मूळ गावी निघून गेले. मे ची परीक्षा जून किंवा जुलै महिन्यात घेण्याचे नियोजन होते. मात्र, केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढवला. त्यामध्ये शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे परीक्षेसाठी जागा देण्यास शैक्षणिक संस्थांनी असमर्थता दर्शविली आहे.
दरम्यान, लॉकडाऊन काळात अनेक विद्यार्थी त्यांच्या परीक्षा केंद्रापासून दूर आहेत. त्यामुळे त्यांना परीक्षा केंद्र बदलून सोईचे केंद्र निवडण्याची मुभा देण्यात आली होती. तसेच ज्या विद्यार्थ्यांना जुलैमध्ये परीक्षा द्यायची नाही, त्यांनी नोव्हेंबर मध्ये परीक्षा द्यावी, असे सूचविण्यात आले होते. मात्र, त्यास विद्यार्थ्यांनी नुकसान होण्याच्या भीतीने विरोध केला होता. तसेच शिक्षण संस्था बंद असल्याने परीक्षांचे नियोजन करणेही कठीण जात आहे.
पूर्वीचेच शुल्क ग्राह्य धरणार
“आयसीएआय’ने मे-जुलै 2020 ची परीक्षा रद्द करून ती थेट नोव्हेंबर 2020 मध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क पुढच्या परीक्षेसाठी ग्राह्य धरले जाईल. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नसल्याचे “आयसीएआय’ने स्पष्ट केले. दरम्यान, आता सीए ची परीक्षा नोव्हेंबरमध्ये होणार असल्याने विद्यार्थ्यांनाही अभ्यासासाठी अधिकचा वेळ मिळणार आहे. जे विद्यार्थी एका ग्रुपची परीक्षा देणार होते, त्यांना आता दुसऱ्या ग्रुपचीही तयारी करण्याची संधी आहे.