चंदीगड – पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावरून अचानक पायउतार करण्यात आलेले कॅ. अमरिंदरसिंग हे त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत काय निर्णय घेणार या विषयी सध्या मोठीच उत्सुकता निर्माण झाली असून ते मंगळवारी दिल्लीत पोहचले आहेत.
ते दिल्लीत काही भाजप नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे असे वृत्त काही माध्यमांनी प्रसारीत केले आहे. तथापी त्याला अमरिंदरसिंग यांचे माध्यम सल्लागार रवीन ठुकराल यांच्याकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.
अमरिंदरसिंग हे खासगी भेटीसाठी दिल्लीला गेले आहेत असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने फारच वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे.
अमरिंदरसिंग यांना वयाच्या कारणावरून तसेच त्यांच्या विरोधात आमदारांमध्ये प्रचंड नाराजी असल्याच्या पार्श्वभूमीवर बदलण्यात आले असले तरी राजकारणात आपल्याला वय कधीच आड येणार नाही असे वक्तव्य अमरिंदरसिंग यांनी नुकतेच केले होते. याचा अर्थ ते अजूनही राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे संकेत यातून मिळाले आहेत.