अनुचित प्रकारांची तक्रार थेट ऑनलाइनद्वारे करता येणार
पुणे -विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातारणात पार पाडण्याचे निवडणूक आयोगासमोरचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी “सी-व्हिजिल’ हे मोबाइल ऍप नागरिकांसाठी उपलब्ध केले आहे. निवडणुकीदरम्यान होणाऱ्या आदर्श आचारसंहिता उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या माध्यमातून थेट ऑनलाइन करू शकणार आहे. या तक्रारीवर अवघ्या 100 मिनिटांत कार्यवाही होणार आहे.
आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारींचा आढावा घेण्यासाठी असलेल्या यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी या ऍपची निर्मिती निवडणूक आयोगाने केली आहे. पूर्वी आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारीची सत्यता तपासून, त्यावर कारवाई करताना यंत्रणेची दमछाक होत असे, तसेच सबळ पुराव्या अभावी संबंधितांवर कारवाई करताना मर्यादा येत असत. या नवीन ऍपमुळे या त्रुटी आणि मर्यादा कमी होणार आहेत. हे ऍप निवडणुकांदरम्यान आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करणाऱ्या नागरिकांसाठी एक नावीन्यपूर्ण अस्त्र असणार आहे. या माध्यमातून नागरिक स्वतंत्र व निष्पक्षपाती निवडणुकांच्या संचालनासाठी सक्रिय आणि जबाबदार भूमिका बजावू शकतात.
ऍपची वैशिष्ट्ये
तक्रारीचे छायाचित्र अथवा व्हिडीओ पुरवा म्हणून थेट अपलोड करण्याची सुविधा आहे. कॅमेरा, चांगले इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस प्रवेशासह सज्ज असलेल्या कोणत्याही स्मार्टफोनवरून या ऍपच्या माध्यमातून आचारसंहिता भंगाची तक्रार नोंदविता येणार आहे.