सुप्यात पोटनिवडणुकीने राजकीय वातावरण तापले

सुपा – पारनेर तालुक्‍यातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या सुपा येथील ग्रामपंचायतीच्या तीन जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, येथील राजकीय वातावरण तापू लागले आहे. तीन जागांसाठी 31 मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून, 23 जूनला मतदान होणार आहे. 31 मे ते 6 जूनपर्यंत नाम निर्देशन पत्र सादर करणे, 7 जूनला नामनिर्देशन पत्रांची छाणणी होणार असून, 10 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. याच दिवशी निवडणूक चिन्ह देण्यात येणार असून, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

आवश्‍यकतेनुसार 23 जून रोजी मतदान होऊन, 24 जूनला मतमोजणी होणार आहे. यानंतर सरपंच पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. तालुक्‍यात सर्वात मोठी पंधरा सदस्य असणाऱ्या सुपा ग्रामपंचायतीची सप्टेंबर 2020 पर्यंत मुदत असल्याने नव्याने निवडून येणाऱ्या सदस्यांना सव्वा वर्षाचा कालावधी मिळणार आहे. विद्यमान दोन सदस्य अपात्र ठरल्याने त्यांच्या जागी कोण बाजी मारणार? याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले असून, गावातील पारावर चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेताना निवडणुकीच्या गप्पा रंगू लागल्या आहेत. निवडणूक जाहीर झाल्याने इच्छुकांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांसह ते आताच प्रचाराला लागले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.