पुणे – बिबवेवाडी परिसरातील एका घरात शिरलेल्या चोरट्याने कर्णबधीर असल्याची बतावणी करून पिशवीतील 3 लाख 84 हजारांचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. कल्पना कृष्णाजी शिरकांडे (वय, रा. घाटकोपर, मुंबई) यांनी यासंदर्भात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरकांडे यांची वयोवृद्ध आई बिबबेवाडी भागातील कोठारी ब्लॉक परिसरात अनंत वसाहतीत राहायला आहे. शिरकांडे आणि त्यांचे पती तिला भेटण्यासाठी नियमित येत असतात.
शनिवारी सकाळी 10.30 वा. सुमारास कल्पना, त्यांचे पती आणि आई घरात होते. कल्पना यांनी मुंबईहून सोन्याचे दागिने आणले होते. दागिने असलेली पिशवी बाहेरच्या खोलीत ठेवली होती. शिरकांडे यांचे पती खोलीत होते. तर कल्पना आईबरोबर बोलत दुसऱ्या खोलीत थांबल्या होत्या. काही वेळानंतर एक तरुण शिरकांडे यांच्या घरात शिरला. त्याने कर्णबधीर असल्याची बतावणी केली. कृष्णाजी शिरकांडे यांना एक पत्रक देऊन चोरट्याने मदत करण्याचे आवाहन केले. कृष्णाजी यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्याने दागिने ठेवलेली पिशवी लांबवली. काही वेळानंतर कल्पना यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. पिशवीत 3 लाख 84 हजार रुपयांचे दागिने होते.