नवी दिल्ली – राज्यसभेच्या दोन रिक्त जागांसाठी 29 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. केरळ आणि पश्चिम बंगालमधून त्या जागा निवडून द्यावयाच्या आहेत. केरळ कॉंग्रेस (एम) या पक्षाचे नेते जोस के.मणी आणि तृणमूल कॉंग्रेसच्या अर्पिता घोष यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. त्या भरण्यासाठी निवडणूक आयोगाने शनिवारी पोटनिवडणूक जाहीर केली. त्यासाठीची अधिसूचना 9 नोव्हेंबरला जारी केली जाईल.
पोटनिवडणुकीसाठी 29 नोव्हेंबरला मतदान होईल. मतदान झाल्यानंतर त्यादिवशीच निकाल जाहीर केला जाणार आहे. मणी यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत जुलै 2024 मध्ये, तर घोष यांच्या सदस्यत्वाची मुदत एप्रिल 2026 मध्ये संपणार होती. आंध्रप्रदेश आणि तेलंगणमधील विधान परिषदांच्या काही जागांसाठीची निवडणूकही 29 नोव्हेंबरला होईल.