नवी दिल्ली – राज्यसभेच्या तीन रिक्त जागांसाठी 1 मार्चला पोटनिवडणूक होणार आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या एका जागेचाही त्यामध्ये समावेश आहे.
राज्यसभेवर गुजरातमधून निवडून द्यावयाच्या दोन आणि आसाममधून निवडून द्यावयाची एक अशा तीन जागांवर पोटनिवडणूक होईल. त्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने गुरूवारी जाहीर केला. पोटनिवडणुकीसाठीची अधिसूचना 11 फेब्रुवारीला जारी होईल. मतदानाच्या दिवशी (1 मार्च) सायंकाळी मतमोजणी करण्यात येईल.
पटेल आणि भाजपचे खासदार अभय भारद्वाज यांच्या निधनामुळे गुजरातमधून निवडून द्यावयाच्या राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या. पटेल आणि भारद्वाज यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत अनुक्रमे ऑगस्ट 2023 आणि जून 2026 मध्ये संपुष्टात येणार होती.
बोडो पीपल्स फ्रंटचे नेते बिस्वजीत दैमारी यांनी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे आसाममधील एक जागा रिक्त झाली आहे. दैमारी यांच्या सदस्यत्वाची मुदत एप्रिल 2026 पर्यंत होती.