नवी दिल्ली – बिहारमधील विधानसभा निवडणुकीबरोबरच इतर राज्यांतील पोटनिवडणुका घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये देशाच्या बऱ्याच भागांत राजकीय रणधुमाळी रंगण्याची चिन्हे आहेत.
देशातील करोना संकटामुळे बिहारमधील निवडणूक वेळेत होणार का आणि इतर राज्यांतील पोटनिवडणुका केव्हा होणार, याविषयी बऱ्याच काळपासून सस्पेन्स होता. निवडणूक आयोगाने आज प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामुळे तो सस्पेन्स बऱ्याच प्रमाणात संपुष्टात आला आहे. बिहार निवडणुकीबरोबरच इतर राज्यांतील पोटनिवडणुका होतील. त्यांचे वेळापत्रक योग्यवेळी जाहीर केले जाईल. केंद्रीय सुरक्षा दलांचा प्रवास, तैनाती आणि इतर व्यवस्थांचे नियोजन त्यामुळे सुलभ होईल, असे आयोगाच्या निवेदनात नमूद करण्यात आले.
बिहार विधानसभेची मुदत 29 नोव्हेंबरला समाप्त होणार आहे. त्यामुळे त्या राज्यात वेळापत्रकानुसार ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणूक अपेक्षित आहे. त्या राज्यातील लोकसभेच्या एका रिक्त जागेसाठीही पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. त्याशिवाय, 14 राज्यांमधील विधानसभांच्या 64 रिक्त जागांसाठीही पोटनिवडणुका प्रलंबित आहेत.
मध्य प्रदेशातील सत्ताबदलानंतर तेथील विधानसभेतील 27 जागांसाठी पोटनिवडणुका घ्याव्या लागणार आहेत. गुजरात आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी 8 जागा रिक्त आहेत. त्या राज्यांचे राजकीय महत्त्व विचारात घेता पोटनिवडणुकाही प्रतिष्ठेच्या बनणार आहेत.