नागपूर : देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीत काँग्रेसने ९ जागा जिंकून चांगलीच मुसंडी मारली. तर राष्ट्रवादीला दोन जागांवर समाधान मानावे लागले. या पोटनिवडणुकीत जिल्हा परिषदेतील विरोधीपक्ष नेत्याचा पराभव झाला असून भाजपला एका जागेचा फटका बसला.
२०२० मध्ये ५८ सदस्य असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे ३० उमेदवार विजयी झाले होते. पण ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढल्याने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्य निवडणूक आयोगाने १६ ओबीसी सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते.
दरम्यान रद्द झालेल्या सदस्यांमध्ये काँग्रेसचे ७ सदस्य होते. तर एकूण १६ जागा खुल्या प्रवर्गात मोडल्या. पोटनिवडणुकीत काँग्रेसने ७ जागा कायम ठेवून अतिरिक्त दोन जागेवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आणले. या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केली असली तरी राष्ट्रवादीला आपल्या ४ जागा कायम ठेवता आल्या नाही.
पोट निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल
काँग्रेस – ३३
भाजप – १४
राष्ट्रवादी – ८
शिवसेना – १
शेकाप – १
गोगपा – १