बांधकामाकरिता साहित्यच मिळेना; लाभार्थ्यांची पिळवणूक
रेडा (प्रतिनिधी) – इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात व इंदापूर शहरात शासनाच्या विविध घरकुल योजना सुरू आहेत, त्यामुळे गोरगरीब जनतेची घरकुलांची कामे सुरू आहेत. मात्र, बांधकाम सहित्यच उपलब्ध होत नाही. बांधकामांकरीता महसूल प्रशासनाला अधिक पैसे मोजावे लागत आहेत. याचा फटका बसून घरकुल लाभार्थ्यांची पिळवणूक
होत आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, इंदापूर तालुक्याला निसर्ग लाभला आहे. याच तालुक्यांमध्ये दोन्ही बाजूंनी नीरा व भीमा नदी आहे, असे असतानाही बांधकामाकरीता आवश्यक साहित्य जादा पैसे देवून घ्यावे लागत आहे.
इंदापुर तालुक्यामध्ये शासनाची रमाई आवास घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी माता आवास योजना अशा अनेक योजनांची घरकुलाची कामे प्रगतीपथावर आहेत. या घरकुलांच्या कामासाठी बांधकाम साहित्य मिळावे, याकरीता सामान्य गोरगरीब जनतेला अक्षरश: हात जोडावे लागत आहेत. अन्य ठिकाणी असे साहित्य सहजपणे उपलब्ध होत असताना शासकीय घरकुलांच्या कामात मात्र असे साहित्य पुरविण्यात संबंधीतांकडून चालढकल केली जात असून चढ्या दरानेही त्याची विक्री केली जात आहे.
शासनाच्या तुटपुंज्या मदतीवर झोपडीतला माणूस घर बांधतो. घराचे स्वप्न पाहतो, मात्र अशा बांधकाम साहित्य पुरविणाऱ्या तस्कर, माफियांच्या विळख्यात हा सापडल्याने सामान्य लाभार्थी पुरता हैराण झालेला आहे. बांधकाम सहित्याचे दर गगनाला भिडल्यामुळे अनेक घरकुल लाभार्थ्यांची इच्छा असताना देखील आपल्या घरकुलाचे काम अर्धवट ठेवलेली आहेत. तालुक्यांमध्ये जे घरकुल लाभार्थी आहेत, अशा लाभार्थ्यांना कमी किमतीने बांधकाम साहित्य मिळणे गरजेचे असून प्रशासनाने याबाबत प्रयत्न करावेत तसेच साहित्य पुरवठा माफक किंमतीत उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी गावागावातील लाभार्थ्यांकडून होत आहे. घरकुल धारक लाभार्थ्यांना बांधकाम सहित्य माफक किंमतीत उपलब्ध करून देण्याचा नियम आहे. मात्र, इंदापूर तालुक्यात हा नियम पायदळी तुडविला
जात आहे.
जागा आहे पण…
इंदापूर तालुक्यातील शेकडो लाभार्थ्यांना घरकुल मंजुर झालेली आहेत. घरकुलाकरीता लागणारी जागा उपलब्ध असली तरी घर बांधण्याकरीता जे साहित्य लागते तेच उपलब्ध होत नसल्याने अनेकांनी कामच सुरू केलेले नाही. बांधकामकरीता साहित्य उपलब्ध करून देणे ही शासनाचीही जबाबदारी आहे. परंतु, याकडे संबंधीत विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.
शासनाच्या विविध योजनांतून लाभार्थ्यांचे घरकुल पूर्ण व्हावे, याकरीता प्रशासनाचा प्रयत्न असतो. ज्या ठिकाणी घरकुल बांधणी तसेच बांधकाम साहित्याबाबत अडचणी आहेत, अशा लाभार्थ्यांनी संपर्क साधवा. संबंधीतांना त्यानुसार सुचना केल्या जातील.
– सोनाली मेटकरी, तहसीलदार, इंदापूर