निर्भयाच्या मारेकऱ्यांचा गळफास तयार!

बक्‍सर कारागृहाला दहा दोरखंड बनवण्याचे आदेश
पाटणा : फाशीचा दोरखंड बनवण्यासाठी प्रख्यात असणाऱ्या बक्‍सर जिल्हा कारागृहाला 10 दोरखंड या आठवड्याअखेर तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या आठवड्यात दिल्लीत गाजलेल्या निर्भयाकांडांच्या आरोपींना फाशी दिली जाण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. मात्र फाशीचे हे दोरखंड कोणत्या कारागृहात पाठवणार आहेत याबाबत मात्र गोपनियता पाळण्यात आली आहे.

आम्हाला दहा दोरखंड 14 डिसेंबर पर्यंत तयार ठेवण्याची सुचना कारागृह प्रशासनाकडून आली आहे. त्याचा वापर कोठे केला जाणार आहे, याची आम्हाला कल्पना नाही. बक्‍सर कारागृहाचा फाशीचे दोरखंड बनवण्यासाठी हातखंडा आहे, असे बक्‍सरचे कारागृह अधिक्षक विजयकुमार अरोरा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले. एक दोरखंड करायला तीन दिवस लागतात. ते मुख्यत: मनवी श्रमातून करण्यात येतात. त्यासाठी यंत्रांची फारच कमी मदत घेतली जाते, असे त्यांनी सांगितले.

संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूला दिलेला गळफास याच कारागृहात बनवण्यात आला होता. पतियाळा कारागृहाकडून 2016-17 मध्ये दोरखंड पुरवण्याचे आदेश मिळाले होते. मात्र त्याचे कारण समजू शकले नाही.

शेवटचा दोरखंड एक हजार 725 रुपयांना देण्यात आला होता. मात्र त्याची किंमत वेळोवेळी बदलते. हे बदल पितळ आणि लोखंडाच्या किंमतींमुळे होतात. गळफास दिल्यानंतर मनुष्याच्या वजनाने त्याची गाठ सुटू नये अथवा दोर तुटू नये यासाठी हे धातू त्यात वापरले जातात. सुमारे पाच ते सहा जण एक दोरखंड तयार करण्यासाठी कार्यरत असतात. 152 सुतांची एक वळी अशा सात हजार वळींना एकत्र गुंफुन हा दोरखंड तयार करण्यात येतो.
हे दोर बनवून दीर्घकाळ ठेवता येत नाहीत. तसे ठेवल्यास ते वापरण्यायोग्य रहात नाहीत. मात्र वेळेत दोरखंड देण्यात कोणतीही अडचण नाही. तेवढे कुशल मनुष्यबळ कारागृहात उपलब्ध आहेत, असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.