शीतनिद्रा व वंशवृद्धीसाठी शोधू लागले आसरा
पिंपरी (प्रतिनिधी) – सध्या थंडीचा काळ सुरू आहे. थंडीच्या दिवसांत फुलपाखरांची लगबग ही वंशवृद्धीकडे व शीतनिद्रेकडे चालू आहे. सर्व फुलपाखरे थंडीचा काळ अंडी, अळी व कोश स्वरूपात घालवतात. नैसर्गिक अधिवासाची कमतरता, टेकड्यांमधील नैसर्गिक गुहा, कपारी, मोठे वृक्ष यामध्ये होत असलेली घट यामुळे फुलपाखरांनीसुद्धा शीतनिद्रेसाठी आपला मोर्चा छोट्या-मोठ्या इमारतींकडे वळविल्याचे पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत असणाऱ्या प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पक्षी-कीटक अभ्यास गटाला आढळून आले आहे.
अभ्यासातील काही महत्त्वपूर्ण बाबी…
पिंपरी चिंचवड, मावळ, मुळशी परिसरात थंडीचे प्रमाण जास्त असते. ज्या भागात थंडी असते अशा भागातील केसाळ वन्यजीव उदा. खार तसेच कीटकांमध्ये फुलपाखरे हे डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यादरम्यान शीतनिद्रा घेत असतात. नर व मादी अंडी म्हणजेच वंशवृद्धीकडे चालू लागतात. कीटक उन्हाळ्यात अंड्यातून बाहेर पडतात, वनस्पतीची पाने खातात, उन्हाळा वाढल्यानंतर अळ्या कोश बनविण्याच्या अवस्थेत पोहचतात अशा अवस्थेत ते पावसाळा ऋतू पार करतात व वसंत ऋतूमध्ये ते फुलपाखरामध्ये परिवर्तीत होतात.
शरद ऋतूत टेकड्या, कड्या कपारी व नैसर्गिक गुहांच्या छताला चिकटून आश्रय घेतात. परंतु वाढत्या शहरीकरणाचा फटका वन्यजीवांना ही बसू लागला आहे.त्यामुळे आता फुलपाखरांचा मोर्चा इमारतीच्या छताकडे वळू लागला आहे. डिसेंबर व जानेवारीमध्ये ही फुलपाखरे वातावरणामध्ये थोडा उष्मा वाढला की इमारतीबाहेर पडतात व संध्याकाळी पुन्हा इमारतींचा सहारा घेतात. या काळात उपाशी राहण्याचीही त्यांची सवयही निदर्शनास आली. या वर्षी उन्हाळा उष्णतामय व पावसाळा चांगला बरसल्यायामुळे फुलपाखरांच्या संख्येत वाढ झाली आहे.
पर्यावरण विभागाचे पक्षी व कीटक अभ्यासक कविता बेंडाळे, अर्चना घाळी दाभोळकर, गौरी सरोदे, देवयानी पाटील, विजय मुनोत, संदीप सकपाळ, मंगेश घाग, राम सुर्वे, जयेंद्र मकवाना, विशाल शेवाळे, राजेश बाबर, तेजस सापरिया, संतोष चव्हाण, अमोल कानू, अमित डांगे, विजय जगताप यांनी समिती अध्यक्ष विजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली फुलपाखरांविषयी शहरात काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. या अभ्यास गटाने दिनांक 20 डिसेंबर 2019 ते 25 डिसेंबर 2019 दरम्यान निगडी, प्राधिकरण, शाहूनगर, चिखली या उपनगरांमध्ये शीतनिद्रा, फुलपाखरे व त्यामध्ये होत असलेले परिवर्तन या विषयी अभ्यास केला. गेल्या वर्षीही म्हणजेच डिसेंबर ते फेब्रुवारी 2018 मध्येही या विषयी अभ्यासगटाने निरीक्षण केले होते.
या संदर्भात विजय पाटील म्हणाले, की शहर हे विविध वन्यजीव, कीटक व पक्ष्यांनी समृद्ध आहे. अनेक तज्ज्ञ त्यांच्या सुरक्षेसाठी शहरात कार्यरत आहेत. समितीच्या अभ्यासकांनी शीतनिद्रा व फुलपाखरे यांचा अभ्यास 2018 व 2019 या दोन वर्षी केला. त्यानुसार अनेक महत्त्वाच्या बाबी सामोर आल्या आहेत. वाढत्या विकासाबरोबर कीटकसुद्धा त्यांच्या जीवनशैलीमध्ये बदल करत असतात. हे निरीक्षण फुलपाखरांच्या ह्या कृतीमुळे दिसून आले आहे.