मुंबई – आयपीएल स्पर्धेत मंगळवारी झालेल्या रॉयल चॅलेंजर बेंगळुरुविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 3 गडी गमावून 169 धावा केल्या. सलामीवीर जोस बटलर, देवदत्त पडीक्कल व शेमरन हेटमायर यांच्या उपयुक्त फलंदाजीमुळे त्यांना समाधानकारक धावसंख्या उभारता आली.
बेंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसी याने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजी दिली. बेंगळुरुच्या गोलंदाजांनी केलेल्या अचुक माऱ्यासमोर राजस्थानच्या कसलेल्या फलंदाजांनी एकेरी धावाही घेण्यात अपयश येत होते. त्यातच यशस्वी जयस्वाल पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्यानंतर बटलरने पडीक्कलसह दुसऱ्या गड्यासाठी 70 धावा जोडल्या.
धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात पडीक्कल 29 चेंडूत 2 चौकार व 2 षटकार फटकावत 37 धावांवर परतला. कर्णधार संजू सॅमसननेही निराशा केली. यावेळी शेरन हेटमायरने हटलरला सुरेख साथ दिली. या जोडीने संघाचे दीडशतक फलकावर लावले. बटलरने आपले अर्धशतकही थाटात पूर्ण केले. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 83 धावांची अखंडीत भागीदारी केली.
बटलरने नाबाद 70 धावांची खेळी करताना 47 चेंडूत 6 षटकार फटकावले. त्याला सुरेख साथ देताना हेटमायरने 31 चेंडूत 4 चौकार व 2 षटकार यांच्या मदतीने नाबाद 42 धावा केल्या. बेंगळुरुकडून हर्षल पटेल, डेव्हीड विली व वनिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – राजस्थान रॉयल्स – 20 षटकांत 3 बाद 169 धावा. (देवदत्त पडीक्कल 37, जोस बटलर नाबाद 70, शेमरन हेटमायर नाबाद 42, हर्षल पटेल 1-18, डेव्हीड विली 1-29, वनिंदू हसरंगा 1-32).