…पण यंदाही “टेमघर’ रिकामे करावे लागणार

पुणे – टेमघर धरण गळतीमुक्‍त करण्याचा निर्धार जलसंपदा विभागाने केला आहे. यंदा टेमघर धरण 100 टक्के भरण्यात येणार आहे. पावसामुळे धरणाच्या आतील बाजूच्या भिंतीस सिमेंटचे अस्तरीकरण थांबविण्यात आले. डिसेंबरपासून दुरुस्ती पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. शहराला पिण्यासाठी आधी टेमघर धरणातील पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी टेमघर धरण यंदा लवकर रिकामे करण्यात येणार आहे.

सध्या टेमघर धरण दुरुस्तीचा पहिला व दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. या कामामुळे धरणातील गळती कमी होण्यास मदत झाली आहे. या धरणाची पावणेचार टीएमसी एवढी क्षमता आहे. गळतीमुळे हे धरण 60 ते 70 टक्के भरू दिले जात होते. गेल्या वर्षी हे धरण सुमारे 80 टक्के भरण्यात आले. धरणातून कोठे गळती होत आहे, याची पाहणी करून गळतीच्या ठिकाणी खुणा करून दुरुस्ती केली जाणार आहे. खडकवासला धरणातील पाणीसाठ्याच्या दुप्पट पाणीसाठा या धरणात होतो.

शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम नाही
खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या चार धरणांमधून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. वरसगाव, पानशेत आणि टेमघर या तीन धरणांमधून टप्प्याटप्प्याने शहरासाठी पाणी खडकवासला धरणात सोडले जाते. यावेळी पाणी सोडताना प्राधान्य टेमघर धरणाला दिले जाणार असून शहरासाठी आधी टेमघर धरणातील पाणी खडकवासला धरणात सोडले जाणार आहे. टेमघर धरण लवकर रिकामे केले, तरी शहराच्या पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होणार नसल्याची माहिती पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.