नवी दिल्ली : उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांचीच चर्चा सध्या देशभर होत आहे. फाटकी जीन्स घालणाऱ्या महिला आपल्या मुलांवर काय संस्कार देणार?, असे वादग्रस्त वक्तव्य रावत यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर सर्वच स्तरांतून टीका झाली. दरम्यान, त्यांच्यावर टीका झाल्यानंतरही रावत यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे.
तीरथ सिंह रावत यांनी वादग्रस्त विधानावर बोलताना,“आपला महिलांनी जीन्स वापरण्याला विरोध नाही, पण फाटक्या जीन वापरण्याला विरोधच आहे,” असे रावत यांनी म्हटले आहे. तीरथ सिंह रावत यांनी बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना वक्तव्य केलं होतं. ज्याचे देशभरात पडसाद उमटले.
सर्वच स्तरातून टीका होत असताना रावत यांना त्यांच्या विधानाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपला महिलांनी फाटक्या जीन्स वापरण्याला विरोध कायम असल्याचे म्हटले. “माझा महिलांनी जीन्स वापरण्याला विरोध नाही. पण, फाटक्या जीन्स वापरण्याला माझा विरोधच आहे,” असे रावत यांनी म्हटलं आहे.
“एकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितलं की, एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन जवळच बसलेली होती. त्या महिलेनं फाटलेली जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारलं की कुठे जायचं? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला. त्या महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते. माझ्या मनात विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते. लोकांना भेटते. अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करते. जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा असं नव्हतं,” असंही रावत म्हणाले. तरुणांमध्येही व्यसन वाढत चाललं आहे. नशेबरोबरच आपल्याला सर्व विकृतींपासून मुलांना दूर ठेवून संस्कारी बनवावं लागेल. तसेच पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावापासून दूर राहावं लागेल,” असं विधान रावत यांनी केलं होतं.