केपटाऊन – आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मला मिळालेले सर्व यश, प्रतिष्ठा घ्या, पण माझ्या वडिलांना पूर्ण बरे करा, असे आवाहन इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स याने केले आहे.
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडला प्रथमच विजेतेपद मिळवून देणारा स्टोक्स सर्व देशाचा हिरो ठरला होता. त्याने त्यानंतर झालेल्या ऍशेस कसोटी मालिकेतही इंग्लंडला बरोबरी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. आता स्टोक्सचा इंग्लंड संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू असतानाच स्टोक्सच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याचे वडील गेड स्टोक्स ही मालिका पाहण्यासाठी येथे आले होते. आता आजारी पडल्यामुळे ते जोहान्सबर्गमधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. वडील रुग्णालयात दाखल झाल्यामुळे बेन स्टोक्स पहिला कसोटी सामना खेळू शकला नाही. आता वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे तो दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी येथे दाखल झाला आहे.
2019 हे वर्ष माझ्यासाठी यश देणारे ठरले. माझ्याकडून चांगली कामगिरी झाली असली तरी आता माझे वडील रुग्णालयात आहेत. माझ्या यशाच्या बदल्यात जो कोणी माझ्या वडिलांची प्रकृती बरी करून देईल, त्याला मी माझे सगळे यश द्यायला तयार असल्याची भावना स्टोक्सने व्यक्त केली आहे.
प्रकृतीच्या तक्रारींची मालिका
दक्षिण अफ्रिकेचा दौरा सुरू झाल्यापासून इंग्लंड संघाच्या अकरा खेळाडूंची तब्येत बिघडली आहे. डोम सिबले, जो डेनली, जो रुट, ऑली पोप, बेन स्टोक्स, जोस बटलर, ख्रिस वोक्स, जॅक लीच, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड आणि मार्क वुड हे खेळाडू आफ्रिका दौऱ्यात आजारी पडले आहेत.