…पण कोरोनाग्रस्तांना मरू देवू नका !

निशिकांत पाटलांची जयंत पाटीलांना आर्त हाक

इस्लामपूर :  प्रकाश हॉस्पिटलमध्ये 650 बेडसाठी ऑक्सिजनची व्यवस्था व कोरोनाग्रस्तांसाठी सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत. प्रशासनाची तयारी असताना आम्हाला ज्यादा बेडची मान्यता मिळू दिली जात नाही. राजकारण व वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून जयंत पाटील यांना 3  वेळा फोन केले, मेसेज केले पण प्रत्युत्तर नाही. आमच्या हॉस्पिटलला स्वतः भेट द्या, व्यवस्था पहा, वाटलं तर परवानगी द्या. कोरोना बाधितांना उपचाराअभावी मरू देऊ नका अशी आर्त हाक भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष, नगराध्यक्ष व प्रकाश हॉस्पिटलचे संस्थापक निशिकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेतून पालकमंत्र्यांना दिली.

सप्तपदी आमदार असणाऱ्यांनी कोविडसाठी एकही बेड उभा केला नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कारखानदारांना कोविड हॉस्पिटल उभारण्याचे दिलेले आदेश खुद राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी धुडकावले. ते निष्क्रिय पालकमंत्री असल्याचा आरोप नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केला.

ते म्हणाले ,” जिल्हयात ऑक्सिजन बेड मिळत नाही, ऑक्सिजनची उपलब्धता नाही. रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाहीत. जिल्हयामध्ये लसीकरण ठप्प झाले आहे. याला पालकमंत्री जयंत पाटील यांचे अपयश कारणीभूत आहे. प्रकाश हॉस्पिटलसारखे अनेक हॉस्पिटल कोविडच्या काळात प्रशासनाला सहकार्य करायला तयार आहेत. त्यांना मात्र पालकमंत्र्यांच्या दबावाखाली कोविडचे पेशंट घेण्यासाठी परवानगी दिली जात नाही ही जिल्हयाच्या दृष्टीने दुर्दैवाची बाब आहे.

ते म्हणाले, ‘जयंत पाटील कोरोनाच्या महामारीतही राजकारण करत आहेत. इस्लामपूर शहरात आणि वाळवा तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ऑक्सिजनअभावी रुग्ण तडफडून मरत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री, मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून जयंत पाटील यांनी काय केले? हे जाहीर करावे. मागच्या लाटेतही त्यांनी एक रुपया मिळवून दिलेला नाही हे सर्वज्ञात आहे.

इस्लामपूर आणि आष्ट्यात सध्या जे कोविड हॉस्पिटल आहेत ते मध्यवर्ती भागात आहेत. त्याचा स्थानिकांना मोठा त्रास होतो. रुग्णांमुळे नातेवाईक आणि नागरिकांना त्याचा संसर्ग होऊ शकतो याकडे जयंतरावांचे लक्षच नाही. ज्यांची इच्छा नाही त्यांच्यावर जबरदस्तीने कोविड सेंटर लादत आहेत. आमच्याकडे 650 बेड्ससाठी ऑक्सिजनची व्यवस्था व अन्य सुविधा असताना व प्रशासनाची तयारी असतानाही ‘प्रकाश हॉस्पिटल’ला मान्यता मिळू दिली जात नाही. आजअखेर वारंवार पाठपुरावा करूनही केवळ 175 बेड्सलाच परवानगी दिली. पैकी 70 बेडला सोमवारी रात्री उशिरा परवानगी दिली आहे.

ते म्हणाले ,” एकीकडे उपचाराअभवी रुग्ण मृत्यमुखी पडत आहेत. तर दुसरीकडे सुविधा असणाऱ्या रुग्णालयांना परवानगी मिळू दिली जात नाही, हे दुर्दैवी आहे. सुविधांपासून कोविड रुग्णांना वंचित ठेवणारी ही प्रवृत्ती समूळ नष्ट करण्याची गरज आहे. शासनाकडून व स्वयंसेवी संस्थांनी जिल्ह्यासाठी जे व्हेंटिलेटर दिले त्यातील एकही आम्हाला मिळू दिला नाही. 650 रुग्णांची व्यवस्था असताना मंजूर क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण असतील तर त्यांना डिस्चार्ज द्या, असे सांगितले जाते, हा कुठला न्याय? त्यांनी कुठे जायचे? जयंतराव त्यांची सोय तुम्ही करणार का?

ते म्हणाले,” कोरोनाच्या काळात योग्य नियोजन करा. नाहीतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष व राज्यपाल यांच्याकडे न्याय मागण्यासाठी निवदेन देणार आहे. तिथेही न्याय मिळालाच नाही तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून करणार आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशाला प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या जयंत पाटील यांनी वाटाण्याच्या अक्षदा लावल्या. त्यांनी काय केले? 4 कारखाने असूनही एकही बेड उपलब्ध करून दिला नाही. स्वतः करायचे नाही आणि जो करतोय त्याच्या द्वेषातून राजकारण आणून त्यालाही करू द्यायचे नाही अशी कुटनीती आहे. 7 वेळा आमदार, मंत्री असूनही आपण मतदारसंघासाठी काय केले?  रेमडेसिविर इंजेक्शन जाणीवपूर्वक मिळू दिले जात नाही. कृपा करून शनिवारी-रविवारी पाहुण्यासारखे न येता जिल्ह्यात तळ ठोकून बसा आणि रुग्णांचे प्राण वाचवा.
यावेळी नगरसेवक वैभव पवार, भाजपा तालुकाध्यक्ष धैर्यशील मोरे, चंद्रकांत पाटील, संदीप सावंत उपस्थित होते.

जयंत पाटलांशी आमचे वैचारिक, राजकीय मतभेद आहेत. पण पालकमंत्री कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत खूनशी अन् कुरघोडीचे राजकारण करत आहेत. भाजपने कोरोनाच्या संकटात सातत्याने मदतीची भूमिका घेतली आहे, आम्हालाही सांगाल ती मदत करायला आम्ही तयार आहोत. तुम्ही त्यासाठी मोठे मन दाखवा. कोरोनाच्या काळात राजकारण करू नका. जिल्हयात राजारामबापू पाटील, वंसतदादा पाटील, पंतगराव कदम, आर.आर.पाटील यासारखे मोठे नेते होवून गेले, पण त्यांनी विधायक कामात कधीही राजकारण केले नाही. मात्र पालकमंत्री जयंत पाटील हे कुटनीतीचे राजकारण करत निष्क्रियता दाखवत आहेत.

प्रकाश हॉस्पिटलमध्ये 650 बेडची सोय आहे. 6 के.एल क्षमतेचे ऑक्सिजन टँक आहे. तसेच आरटीपीसीआर, एचआरसीटीची सोय आहे. यामुळे रुग्णांची सगळी सोय एका छताखाली होत आहे. हॉस्पिटल प्रशासनाकडून या सोयींचा उपयोग कोविड रुग्णांना होईल. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. मात्र या पत्राची दखल घेतली नाही. महात्मा फुले जनआरोग्य योजना प्रकाश हॉस्पिटलमध्ये कोविडसाठी आहे. पण इतर रुग्णांना
स्थगित केली जाते, हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.