कोलकता – कारमध्ये मोठी रोकड आढळल्याबद्दल झारखंडमधील कॉंग्रेसच्या तीन आमदारांना पश्चिम बंगालमध्ये काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. ती रोकड कोलकतास्थित व्यावसायिकाने हवालामार्गे पाठवल्याचे उघड झाले आहे. आमदारांना रोकड देणाऱ्या व्यावसायिकाचे नाव महेंद्र आगरवाल असे आहे.
त्याच्या कार्यालयावर मंगळवारी बंगाल सीआयडीने छापा टाकला. त्या छाप्यावेळी 3 लाख रूपयांची रोकड, अनेक बॅंक पासबुक आणि चांदीची 250 नाणी जप्त करण्यात आली. झारखंडमधील आमदारांच्या कारमध्ये 49 लाख रूपयांची रोकड आढळली. ती रोकड आमदारांना आसाममध्ये देण्यात आल्याचा संशय आधी व्यक्त करण्यात आला होता. मात्र, संबंधित रोकड आगरवालने दिल्याचे स्पष्ट झाले. आमदारांना अटक झाल्यापासून तो गायब आहे. तिन्ही आमदार सध्या सीआयडीच्या कोठडीत आहेत.
रोकड प्रकरण समोर आल्यावर कॉंग्रेसने त्यांना निलंबित केले. तसेच, आमदार फोडून भाजप झारखंडमधील सरकार पाडण्याचे कारस्थान रचत असल्याचा आरोप केला. झारखंडमध्ये झामुमो, कॉंग्रेस आणि राजद या पक्षांचे आघाडी सरकार सत्तेवर आहे. कॉंग्रेसने केलेला आरोप भाजपने याआधीच फेटाळून लावला आहे. त्यामुळे रोकड प्रकरणाचे गूढ अद्याप कायम आहे.