चंद्रपूर – करोनाच्या टाळेबंदीत व्यवसाय बुडाल्याने आणि खासगी सावकार तथा बॅंकेच्या कर्जाचा डोंगर झाल्याने व्यापारी नितीन गनशेट्टीवार (वय 43) यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे करोनाच्या टाळेबंदीत चंद्रपूर जिल्ह्यात पंधरा दिवसांत ही तिसऱ्या व्यापाऱ्याची आत्महत्या आहे.
करोनाच्या टाळेबंदीत सलग दोन महिने व्यवसाय बंद राहिल्याने अनेक व्यापारी त्रासले आहेत. त्यांच्यावर खासगी सावकार तथा बॅंकेचे कर्ज झाले आहेत. अशातच खासगी सावकारांनी तर कर्जाची वसूली करण्यासाठी तगादा लावला आहे. चंद्रपूर शहरातील मुख्य बाजारात दुकान असलेले चहापत्ती व बिस्कीटचा ठोक व्यवसाय असलेले व्यापारी नितीन गनशेट्टीवार (वय 43) गणपती मंदिर, बालाजी वार्ड येथील गणपती अपार्टमेंटमधून सोमवारी सायंकाळी अचानक बेपत्ता झाले होते.
घरी पत्नीला भाजीपाला आणण्यासाठी जातो असे सांगून ते घराबाहेर पडले ते परतलेच नाही. दरम्यान, त्यांचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर आज दुपारी शहरालगतच्या हिंगणाळा या ग्रामीण भागातील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.