वाल्याचा झाला वाल्मिकी! कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर सुरू केला व्यवसाय; कारागृह अधीक्षकांच्या उपस्थितीत उद्घाटन

पुणे – चुक कोणाकडूनही होऊ शकते, जन्मतः कोणीही परफेक्ट नसतो. कुठल्यातरी पातळीवर त्यांच्याकडून चुक होते, नंतर संबंधीताला कारागृहात जावे लागते. त्यानंतर आयुष्यभर डाग घेऊन जगावे लागते. बंदी म्हणून शिक्का बसल्यावर समाज जवळ घेतच नाही. एखादा व्यक्ती कारागृहात गेला त्याला आयुष्यभर दोष देणे योग्य आहे का ? याचा समाज म्हणून विचार करण्याची गरज असल्याचे मत अप्पर पोलिस महासंचालक तसेच कारागृह महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी याने व्यक्त केले.

महाराष्ट्र कारागृह प्रशासन व भोई प्रतिष्ठान, आदर्श मंडळ यांच्या माध्यमातून प्रेरणापथ या प्रकल्पांतर्गत कारागृहातून शिक्षा पूर्ण करून आलेल्या बंदी संतोष आतकर यांच्या आयुष्याला उभारी देण्यासाठी त्यांना केशकर्तलनालय व्यावसायाचा लोकार्पण समारंभ पार पडला. यावेळी येरवडा कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले, डॉ. मिलिंद भोई, अ‍ॅड. प्रताप परदेशी आदी उपस्थित होते.

कुलकर्णी म्हणाले, सुधारसेवा हा कारागृह प्रशासनाचा महत्वाचा भाग आहे. आता कैद्यांना कारागृहातून बाहेर पडल्यानंतर आयुष्यात उभारी घेण्यासाठी एक सहकारी बँक पुढे आली आहे. ती बँक कर्ज द्यायला तयार आहे. सहकारी बँकेचा आदर्श आता राष्ट्रीयकृत बँकांनी देखील पुढे आले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

संतोष आतकर यांनी सांगितले, मी मुळचा पंढरपूरचा असताना कौटुंबिक वादातून पत्नीला धक्का लागल्यानंतर तीन पायर्‍यांवरून खाली पडली होती. यामध्ये गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. गुन्हा कबूल केल्यानंतर सदोषमनुष्य वधाच्या गुन्ह्यात मला शिक्षा झाली. कारागृहात केशकर्तनालयाचे काम मिळाले. कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मंडळ यांनी आयुष्यातील पुढील वाटचाली साठी केशकर्तनालयासारखा व्यावसायास मदत करून वाल्याचा वाल्मिकी केल्याचे आतकर म्हणाले. जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होऊ नये म्हणून मी आता सांगलीत केशकर्तलनालयाच्या माध्यमातून आयुष्याला नवीन सुरूवात करत असल्याचे आतकर यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.