नवी दिल्ली -टाट्रा ट्रक व्यवहारातील गैरप्रकारांच्या आरोपांवरून सध्या व्हेक्ट्रा ऍडव्हान्सड् इंजिनियरींग प्रा.लि. ही कंपनी सीबीआय तपासाला सामोरी जात आहे. त्यापार्श्वभूमीवर, संरक्षण मंत्रालयाने त्या कंपनीबरोबरच्या सर्व व्यावसायिक संबंधांना वर्षभरासाठी स्थगिती दिली आहे.
व्हेक्ट्राबरोबरचे व्यावसायिक संबंध 14 ऑगस्टपासून स्थगित करण्याच्या निर्णयाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली. टाट्रा व्यवहारातील गैरप्रकाराचा विषय 2012 मध्ये तत्कालीन लष्करप्रमुख व्ही.के.सिंह यांच्या एका दाव्यामुळे समोर आला. लष्करासाठी हलक्या दर्जाचे 600 टाट्रा ट्रक खरेदी करण्याला मंजुरी देण्यासाठी 14 कोटी रूपयांच्या लाचेची ऑफर मला देण्यात आली होती, असे सिंह यांनी त्यावेळी म्हटले होते.
कुठल्याही भूभागावर वापरल्या जाऊ शकणाऱ्या टाट्रा ट्रक झेक बनावटीच्या आहेत. व्हेक्ट्राकडून त्या ट्रकचा पुरवठा सरकारी मालकीच्या भारत अर्थ मुव्हर्स लि.च्या माध्यमातून सशस्त्र दलांना केला जाणार होता. आता सीबीआय तपासाचे कारण देऊन संरक्षण मंत्रालयाने व्हेक्ट्राबरोबरच्या व्यावसायिक संबंधांना स्थगिती दिली आहे. तत्कालीन लष्करप्रमुख आणि विद्यमान केंद्रीय मंत्री सिंह यांच्या आरोपांचा आधारही त्यासाठी घेण्यात आला आहे.