– निमिष गोखले
पुणे – देशातील अन्य राज्यांतील हॉटेल-रेस्टॉरंट डाइन इन करिता सुरू झाली असली तरीदेखील महाराष्ट्रातील हॉटेल-रेस्टॉरंट मात्र डाइन इन करिता सुरू झालेली नाहीत. केवळ पार्सल सेवेवर हा धंदा सुरू असून केवळ 10 ते 15 टक्के ग्राहकच या सुविधेचा लाभ घेत आहेत. यामुळे पुण्यासारख्या मोठ्या शहरातील हॉटेलचालकांवरही उपासमारीची वेळ आली आहे. पुणे शहरातील शनिवार, नारायण, सदाशिव पेठांमधील अनेक नामांकित हॉटेलांच्या शाखा बंद झाल्या असून यामध्ये नॉनव्हेज हॉटेलांची संख्या लक्षणीय आहे. तर, लॉकडाऊनच्या पहिल्याच टप्यात लहान हॉटेलांना टाळे लागले आहे. यातून अडीच लाख कामगार बेरोजगार झाले आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सहा महिन्यांपासून हॉटेल डाइन इनकरिता पूर्णतः बंद असल्याने यातून किमान 550 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. नोंदणीकृत असलेली शहरातील 8 हजार 500 हॉटेल्स डाइन इनकरिता बंद आहेत. पार्सल सुविधेला प्रतिसाद मिळत नसल्याने व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत. बॅंकांचे हप्ते, किराणामाल, मांस-मच्छी पुरवठा करणाऱ्यांची थकलेली बिलं यामुळे या व्यावसायाचे आर्थिक गणितच कोलमडून पडले आहे.
यामध्ये हॉटेल कामगारही भरडला गेला असून अनेकांनी आपले गाव गाठले आहे. यातून मॅनेजर, कुक, कॅप्टन, वेटर, मोरीवाले, सफाईवाले असे कामगार मिळत नसल्यानेही व्यावसायिकांच्या अडचणीत भर पडली आहे.
आंदोलन करणार नाही…
हॉटेल कामगारांचा रोजगार गेला असल्याने हॉटेलमधील डाइन इन सेवा सुरू करावी, याकरिता कोणतेही आंदोलन करणार नाही, असे सूतोवाच गणेश शेट्टी यांनी केले आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे हे दिवस नाहीत. हॉटेल कामगारांवर गुन्हे दाखल झाल्यास त्यांचे पोलीस रेकॉर्ड खराब होऊन भविष्यात त्यांना कोठेही काम मिळणार नाही. याच विचारातून शांततेने हा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न असून येत्या काही दिवसांत हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये डाइन इन सुरू होईल, असा विश्वास गणेश शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.
कर्नाटक, गुजरात, पंजाब, उत्तरप्रदेश सरकारने हॉटेल्समधील डाइन इनसाठी परवानगी दिलेली आहे. मात्र, महाराष्ट्रासह पुण्यातील हॉटेल्स अद्याप बंद का? याबाबत राज्य सरकारशी बोललो आहोत. येत्या काही दिवसांत डाइन इन सुविधा सुरू करू, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे.
– गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलर्स असोसिएशन