वेगळे सीट, वॉकर्स, हॅन्ड रेल व स्टीक्स उपलब्ध होणार
पुणे – प्रवासी बसमध्ये दिव्यांगाच्या सोयीसाठी काही सुधारणा मार्चपासून करण्यात येणार आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंदर्भात पुढाकार घेतला असून केंद्रीय मोटार वाहन कायद्यामध्ये आवश्यक बदल करण्यात येणार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
बस तयार करणाऱ्या सर्व संस्थांना यासंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे बस तयार होऊन बाहेर पडतानाच त्यात दिव्यांगासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असणार आहेत. बस तयार झाल्यानंतर त्या फिटनेस तपासणीसाठी येतात.
यावेळी या बसमध्ये दिव्यांगासाठी आवश्यक त्या उपाययोजना असतील, तरच प्रमाणपत्र मिळणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, दिव्यांगांना बसमध्ये दरवाजाजवळ त्यांच्यासाठी सोईचे सीट उपलब्ध केले जाणार आहे, असे सांगण्यात आले. याठिकाणी चिन्हांची निर्मिती केलेली असेल. सोबतवच काठ्या, वॉकर्स, हॅन्ड रेलची बसमध्ये व्यवस्था असणार आहे.
1 मार्चपासून या दुरुस्त नियमानुसार असलेल्या बस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात मार्गदर्शक सूचनांचा मसुदा सार्वजनिक चर्चेसाठी उपलब्ध करण्यात आला होता. या संदर्भात आलेल्या सूचनांचा विचार करुन नवीन नियमावली तयार केल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.