पुणे – नागरिकांची गर्दी..अनधिकृत वाहने..अन्य वाहनांच्या रांगा..कर्णकर्कश्श हॉर्न..स्थानकांबाहेरचा गोंधळ आणि वाहतूक कोंडी असे चित्र रविवारी शहरातील तीनही बस स्थानकांबाहेर दिसून आले. त्यामुळे खासगी वाहने आणि बसेससाठी आवश्यक पार्किंगच्या नियोजनाअभावी प्रवाशांना कसरत करावी लागत होती.
दिवाळीची सुट्टी संपत असल्याने रेल्वे आणि एसटी स्थानकांवर नागरिकांची गर्दी झाली आहे. शिवाय, त्यामुळे बेशिस्तपणादेखील रविवारी दिसून आला. पुणे स्टेशन, शिवाजीनगर, स्वारगेट या प्रमुख बसथांब्यावर प्रवाशांची अधिक वर्दळ होती. नेहमीच वाहतूक कोंडीचे “स्पॉट’ ठरणाऱ्या या ठिकाणांमध्ये भर पडली. नातेवाईकांना सोडायला-न्यायला आलेल्यांची खासगी वाहने, कॅब आणि रिक्षांनी स्थानक परिसरांतील बहुतांश जागा व्यापली होती. तर, अनेक ठिकाणी वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये वाददेखील झाले.
पुणे स्टेशनच्या परिसरातील कॅब सर्व्हिसेसच्या “पिक-ड्रॉप पॉइंट’मुळे स्थानक आवारात वाहनांच्या रांगा लागल्या. रांगेत उभे राहण्याऐवजी अनेक कॅब आणि रिक्षा मुख्य रस्त्यावरच प्रवाशांना उतरवत होत्या. यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात देखील वाहतूक कोंडी झाली होती. स्वारगेट आगारामध्ये दाखल होणाऱ्या अनेक एसटी बसेस अपुऱ्या जागेअभावी सातारा रस्त्यावरच उभ्या होत्या.
येथे बेशिस्तीचे दर्शन
पुणे स्टेशन
ताडीवाला रोड
स्वारगेट
शिवाजीनगर
वाकडेवाडी (नवीन एसटी स्थानक)