बसस्थानक की समस्यांचे आगार?

प्रवाशांना पडला प्रश्‍न : मोरगावातील स्थानकाची स्थिती

मोरगाव- अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या मोरगाव येथे बसस्थानकाची सध्या दुरवस्था आहे. यामुळे दर्शनासाठी येणारे भाविकांची गैरसोय होत असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष का? तसेच हे बसस्थानक आहे की समस्यांचे आगार आहे, असा प्रश्‍न प्रवाशांसह स्थानिकांना पडला आहे. तरी प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिकांसह प्रवाशांनी केली आहे.

बारामती-पुणे या प्रमुख जिल्हा मार्गालगत हे बस स्थानक आहे. सातारा-शिरूर -पुणे-बारामती या मार्गांकडे जाणाऱ्या बसेस या स्थानकात येतात. हे अष्टविनायक स्थान असल्याने एसटीने प्रवास करणारे प्रवासी बस या स्थानकात विसावतात. गेले अनेक महिने बस स्थानकाच्या आवारात स्वच्छता केलेली नाही, तर प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या फलाटमध्ये कचऱ्याचा ढिग साचला आहे. तसेच स्थानकात पिण्यासाठी पाण्याची कुठलीच सुविधा उपलब्ध नाही. तसेच चौकशी नियंत्रण कक्ष ही नेहमीच बंद असतो. बस स्थानकात येणाऱ्या बसेस व यांचे वेळापत्रक हे समजून घेणे प्रवाशांना जिकिरीचे होत आहे.

गेल्या 15 वर्षांपूर्वी गावातील टकले कुटुंबीयांनी बस स्थानकासाठी लाख रुपयांची जागा विना मोबदला शासनाला दिली. यामागे हेतू एकच होता की गावात येणाऱ्या भक्‍तांची गैरसोय होऊ नये; मात्र प्रशासनाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. वारंवार तक्रारी करूनही सुधारणा होत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. सायंकाळी पाच वाजेनंतर बसस्थानकाच्या आवारात बसेस येत नाहीत. बाहेरील मुख्य रस्त्यांवर एस.टी उभी राहत असल्याने प्रवाशांची धावपळ होते. मोरगाव बस स्थानकात महिला व अन्य प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. तर स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था असल्याने प्रवाशांची विशेषत: महिला प्रवाशांची मोठी कुंचबणा होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)