वुहानमध्ये बससेवा सुरू

हुबेई प्रांतातील लॉकडाऊनही उठण्याची घोषणा

बीजिंग  – करोना रोगाची राजधानी म्हणून चीनमधील ज्या शहराचा उल्लेख केला जातो त्या वुहान शहराची स्थिती आता पूर्वपदावर येत असून तेथील करोना नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. या शहरात गेल्या नऊ आठवड्यांपासून बंद असलेली शहरांतर्गत बससेवा आता सुरू झाली आहे. गेल्या 23 जानेवारी रोजी ती थांबवण्यात आली होती. हुबेई प्रांतात जारी करण्यात आलेले तीन महिन्याचे लॉकडाऊनही उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तथापि हा वुहानमधील लॉकडाऊन येत्या 8 एप्रिल रोजी पूर्ण स्वरूपात मागे घेतला जाणार आहे. सध्या तेथे शहरातील नागरिकांना शहरातल्या शहरात फिरण्याची अनुमती आहे. 8 एप्रिलनंतर त्यांना या शहराच्या व प्रांताच्याही बाहेर जाण्याची अनुमती दिली जाईल. वुहान हे एक कोटी दहा लाख लोकसंख्येचे शहर आहे. हुबेई प्रांतात आणि वुहान शहरात करोनाबाधित नवीन रूग्ण सापडण्याचे प्रमाण आता थांबले आहे.

तथापि ज्या लोकांना याची बाधा झाली आहे त्यातील चार जणांचा आज बळी गेल्याने या रोगाने चीनमध्ये मरण पावलेल्यांची संख्या 3281 इतकी झाली आहे. मंगळवारी संपूर्ण चीनमध्येही करोनाचा कोणताही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. वुहान शहर आणि हुबेई प्रांतातील ज्या व्यक्तीकडे ग्रीन हेल्थ कार्ड आहे त्यांना या शहरातून अथवा प्रांतातून बाहेर पडण्यासही अनुमती देण्यात आली आहे. येत्या शनिवारपासून वुहानमधील मेट्रो सेवाही पूर्ववत करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.