माय मावळ फाउंडेशन : “मोफत घर ते परीक्षा केंद्र वाहतूक सेवा’ सुरू
वडगाव मावळ – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित दहावीच्या परीक्षा मंगळवारपासून (दि. 3) सुरू झाल्या आहेत. मावळ तालुक्यातील 12 परीक्षा केंद्रावर 6 हजार 647 विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचणे अत्यावश्यक असते. ही गरज ओळखून मावळ तालुक्याचे कार्यक्षम आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून माय मावळ फाउंडेशनच्या वतीने सन 2016-17 पासून मावळ तालुक्यातील विविध भागामध्ये “मोफत घर ते परीक्षा केंद्र वाहतूक सेवा’ सुरू करण्यात आली आहे.
या सेवेचे उद्घाटन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 3) तळेगाव दाभाडे येथे करण्यात आले. या मोफत सेवेचे चौथे वर्ष असून, ही सेवा कायमच सुरू राहणार आहे. या उपक्रमाचा 3000 विद्यार्थांना लाभ मिळत असल्याचे उद्योजक सुधाकर शेळके यांनी सांगितले. या उपक्रमांसाठी 100 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मावळ तालुक्यातील आंदर मावळ, पवन मावळ व नाणे मावळ भागातील तळेगाव दाभाडे, लोणावळा, पवनानगर, कामशेत, देहू, देहूरोड, वडगाव, कान्हे, कार्ला, शिवणे, उर्से, थोरण, जांबवली, कांब्रे, चिखलसे, निगडे, आंबळे, खांडी, चांदखेड, आदींसह 70 गावांमधून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर जाण्या-येण्यासाठी मोफत वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचता येत असून, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलींच्या पालकांनी सुनील शेळके यांच्या उपक्रमाचे स्वागत करत आहेत.
शाळा आणि विद्यार्थी…
मावळ तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कुल वडगाव (831), रामभाऊ परुळेकर विद्यालय तळेगाव दाभाडे (826), ऍड पु वा परांजपे विद्यालय तळेगाव दाभाडे (706), शिवाजी विद्यालय देहूरोड (749), संत तुकाराम विद्यालय देहू (447), पवना विद्या मंदिर पवना नगर (406), पंडित नेहरू विद्यालय कामशेत (622), बी एन पुरंदरे विद्यालय लोणावळा (392), न्यू इंग्लिश स्कुल चांदखेड (412), बापूसाहेब भोंडे हायस्कुल लोणावळा (764), ऑक्झि लियम कॉन्व्हेंट हायस्कुल लोणावळा (396) व संपर्क ग्रामीण विद्याविकास केंद्र भांबुर्डे (94) असे एकूण 6,647 विद्यार्थी परीक्षा देत आहेत.