शिंदेवाडीजवळ झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू
कापूरहोळ – शिंदेवाडी (ता. भोर) येथील दरीत शिवशाही बस कोसळून झालेल्या अपघातात 28 प्रवासी जखमी तर 2 जण मृत्युमुखी पडले आहेत. दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात आप्पासाहेब भाऊसाहेब देसाई (वय 76, रा. अकल्पित को-ऑपरेटिव्ह सोसायटी, बारामती) व आणखी एक प्रवाशाचा (नाव, पत्ता समजू शकले नाही) मृत्यू झाला आहे.
राजगड पोलिसात अपघाताची फिर्याद प्रवासी अंकुश लक्ष्णम घाडगे (वय 25, रा. पाथरगव्हाण, ता. पाथरी, जि. परभणी) यांनी बसचालक अमित अभिनंदन चौगुले (वय 28, सांगली डेपो, रा. जैनापूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांच्या विरोधात दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्वारगेट येथून 11:30 वाजता विनावाहक सांगलीकडे निघालेली शिवशाही बस (एमएच 47 वाय 0298) कात्रज जुना घाटातील बोगदा ओलांडून शिंदेवाडीचा घाट उतार उतरत असताना वेगात होती. रस्त्यावरील खड्ड्यांतूनही चालकाने बसचा वेग कमी केला नाही.
त्याचवेळी बसमधील एसी तसेच लाइट बंद होत दुसऱ्या क्षणाला बस रस्त्याकडेच्या कठड्यांना धडक देत दरीत कोसळली. बसमध्ये 30 ते 35 प्रवासी होते. शिंदेवाडीच्या उतारावर वेग अधिक असल्याने वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे 25 फूट दरीत बस तीन ते चार वेळा उलटी-पलटी होत कोसळली.
यात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले, त्यांना अग्निशमन दल येण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांनी बाहेर काढले. तो पर्यंत भारती विद्यापीठ आणि राजगड पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. या बचाव पथकाने गंभीर जखमी प्रवाशांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी राजगड पोलीस, भारती विद्यपीठ पोलीस ठाण्याचे बिट मार्शल आणि अग्निशमन दल व राजगड पोलीस ठाणे कर्मचारीही दाखल झाले, त्यांनीही तातडीने मदत कार्य सुरू केले.
अपघातामध्ये जखमी झालेले प्रवासी पुढील प्रमाणे प्रमाणे :
तेजल विवेक सूर्यवंशी (वय 20, अयोध्या नगरी, शिवनगर, कराड),
वीरभद्र रंगराव सुतार (वय 78 रा. पारे ता.खानापूर), स्वाती उमेश कांबळे (वय 30 रा. मलकापूर कराड), उर्मिला शिरीष पवार (वय 30, रा. विश्रामबाग सांगली), स्मिता यशवंत जोशी (वय 64 रा. विद्यानगर कराड), बाळासाहेब गायकवाड (वय 63, रा. सांगली), हिंदुराव देवकर (वय 71, रा. नरवाड), प्रियंका अभय बुद्रुक (वय 24, शनिवार पेठ, मिरज), रोहित उत्तम भगत (वय 24, मिरज), केदार सुभाष यादव (वय 24, रा. शिंदेमळा, सांगली), अभिदीप नंदकुमार धेंडे (वय 32, रा. कुपवाड, सांगली), प्राची वर्धमान निलाखे (वय 23, रा. इस्लामपूर), प्रज्ञा प्रवीण माने (वय 30,रा. कात्रज, पुणे), भक्ती जोशी (वय, 30), राहुल पाटील (वय 32, रा. कवठे) तसेच सुधीर धोंडे (वय 50, रा. गारखेड, औरंगाबाद), रविंद्र मोहन हातपाके (वय, 26 रा. सांगली), सुजित बनसोडे (वय 31, रा. पुणे), चंद्रशेखर नरगुंदे (वय 66 रा. सांगली), सुमेत हाबळे (वय 19, रा. कात्रज), राजेश बनसोड (वय 20, रा. कोल्हापूर), विवेक चव्हाण (वय 26, रा. कवठेमहाकाळ), अश्विनी दरेकर (वय 55, रा. इस्लामपूर), नंदिनी नरगुंदे (वय 61, रा. सांगली), आनंदी जोशी (वय 4 वर्षे), स्वानंदी जोशी (वय 1 वर्षे), मारूती बरमाटे, अरूण जोशी (रा. कोल्हापूर), अश्विनी खांचे (वय 30, रा. इस्मापूर). सदर घटनेचा तपास राजगड पोलीस ठाणे करीत आहे.