मुंबई – श्रीलंकेत बुरखाबंदीनंतर भारतातही अशी बंदी करण्याची मागणी भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेने केली आहे. शिवसेनेने आपले मुखपत्र सामानातून ही मागणी केली आहे. रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार, असा सवाल शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे. यावेळी शिवसेनेने फ्रान्स, बिटन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया सारख्या देशांची उदाहरणे दिली आहेत. दरम्यान, नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर आहेत.
शिवसेनेने म्हंटले कि, फेस मास्क किंवा इतर साधनांनी चेहरा झाकणार्या व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे जाहीर करून श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस व धैर्याचे दर्शन घडवले. रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? पंतप्रधान मोदी आज अयोध्येला निघाले आहेत, म्हणूनच हा प्रश्न. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात व ब्रिटनमध्येही हेच घडले आहे. मग याबाबतीत हिंदुस्थान मागे का? एक तर असंख्य मुस्लिम तरुणींना बुरखा झुगारायचा आहेच व दुसरे म्हणजे बुरख्याआडून नेमके काय सुरू असते याचा अंदाज येत नाही. बुरख्यांचा वापर करून देशद्रोह, दहशतवाद घडवला जात असल्याची उदाहरणे समोर आली. तुर्कस्तान हे तसे इस्लाम मानणारे राष्ट्र, पण केमाल पाशाला बुरख्याआड काही घडत असल्याचा संशय येताच त्याने त्याच्या देशात मुसलमानी तरुणांची दाढी व बुरख्यांवर बंदी आणलीच होती.