राष्ट्रवादीकडून येडियुरप्पा यांच्या पुतळ्याचे दहन

राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन : मनगुत्तीमध्ये छत्रपतींचा पुतळा तात्काळ बसवण्याची केली मागणी

Madhuvan

कोल्हापूर : कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात ग्रामस्थांनी उभारलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक शासनाने उतरविल्याच्या विरोधात कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कागलमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या पुतळ्याचे दहनही करण्यात आले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नवीद मुश्रीफ म्हणाले, भाजपचे सरकार पदोपदी महापुरुषांचा अपमान करत असतानाच कर्नाटकातील भाजपच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा उतरवून घेऊन समाज विघातक कृत्य केले आहे. अखंड महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण भारत देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर श्रद्धा व निष्ठा असणारे लाखो मावळे आहेत. या घटनेमुळे निश्चित पणाने सर्वच देशवासीयांच्या मनामध्ये हे कटुता निर्माण झाली आहे.

नवीद मुश्रीफ पुढे म्हणाले, मनगुत्ती हे गाव जरी कर्नाटकात असले तरी कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि विशेषत: कागल तालुक्याच्या टप्प्यातील गाव आहे. वेळ पडली तर त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करावे लागेल तरी चालेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुनर्प्रस्थापित केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. यावेळी कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवानंद माळी यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कागल शहराध्यक्ष संजय चितारी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष विकास पाटील -कुरूकलीकर, नगरसेवक आनंदा पसारे, पंकज खलिफ, अमित पिष्टे, बॉबी बालेखान, युवराज जाधव, संदीप बोभाटे, विजय दाभाडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.