सातारा – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकेरी भाषा वापरुन त्यांचा अवमान केल्याचा आरोप करत खा. उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे रविवारी सायंकाळी पोवईनाका परिसरात दहन करुन निषेध केला. यावेळी श्री. दानवे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीच्या प्रतिक्रिया गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप प्रवक्ते द्विवेदी, मंत्री मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड आदींकडून व्यक्त झाल्या होत्या. या प्रतिक्रियांवरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. खा. उदयनराजे भोसले यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेवून टीका करणाऱ्यांचा जोरदार समाचार घेतला होता.
उदयनराजेंच्या तक्रारीची राष्ट्रपतींकडून दखल घेण्यात आली होती. राज्यातील वातावरण या मुद्यावरुन तापलेले असतानाच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवरायांबद्दल एकेरी भाषा वापरल्याने उदयनराजे समर्थक चांगलेच आक्रमक झाले. “एक नेता एक आवाज उदयनमहाराज उदयनमहाराज अशा घोषणा देत उदयनराजे समर्थकांनी पोवईनाका परिसरात मंत्री रावसाहेब दानवे यांचा निषेध करुन त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी श्री. दानवे यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनादरम्यान पोलिस व आंदोलकांची शाब्दिक खडाजंगी झाली.