fbpx

धक्कादायक ! दलित महिला सरपंचाच्या पतीला जिवंत जाळले

अमेठी – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा लोकसभा मतदार संघ असलेल्या अमेठीच्या एका गावात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या गावाच्या दलित महिला सरपंचाच्या पतीचे अपहरण करून त्यांना जिवंत जाळण्यात आले. त्यांच्या विव्हळण्याने ते त्यांच्या कुटुंबीयांना सापडले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.

कुटुंबीयांनी या प्रकरणात गावातीलच पाच जणांवर आरोप केला आहे. सदर घटनेनंतर गाव आणि परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेठीच्या बंदोईया गावात ही घटना घडली आहे. सरपंच छोटका यांचे पती अर्जुन यांचे गुरुवारी रात्री अपहरण करण्यात आले होते.

थोड्या वेळाने गावातीलच एका घराच्या कंपाउंडच्या आत अर्जुन 90 टक्के जळालेल्या अवस्थेत सापडले होते. याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबाने तेथे धाव घेतली व ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार सायंकाळी सहा वाजता अपहरण करण्यात आले व त्यानंतर त्यांना जाळून त्यांची हत्या करण्यात आली.

तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार अर्जुन जळालेल्या अवस्थेत पडले असल्याचे ग्रामस्थांनी त्यांना कळवले. त्यानंतर पोलिसांनीच त्यांना रुग्णालयात दाखल केले. कुटुंबीयांनी पाच जणांवर संशय व्यक्त केला आहे. पोलीस आरोपींच्या मागावर असल्याचेही सांगण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.