शिराळा (प्रतिनिधी) – मोही (ता.खानापूर) येथील दोन घरफोड्या विटा पोलिसांनी उघडकीस आणल्या. मिरजेतील एका तरुणांसह दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा एक साथीदार फरार आहे. चोरट्यांकडून 97 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
1 ऑगस्ट रोजी भर दुपारी तीनच्या दरम्यान येथील सुनिता दिलीप जाधव (वय 40), जाऊ पुष्पा रामचंद्र जाधव यांची घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम सोन्या-चांदीचे दागिने असा 1लाख 37 हजार रुपयांचा माल लांबविला होता. या प्रकरणी पोलिसात सुनिता जाधव यांनी फिर्याद दाखल केली होती. पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांना माहिती मिळाल्यावरून चोरटे सिल्वर कलरच्या चारचाकीतुन आले होते. तिचा नंबर एम एच दहा 67 74 असा होता.
लिंगनूर तालुका मिरज येथील सदरची चार चाकी होंडा कंपनीची असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी लोकेश रावसाहेब सुतार लिंगनूर, प्रवीण वसंत देसाई राहणार भिवघाट यांना तपासाअंती अटक केली आहे. त्यांच्याकडून सोने-चांदीचे दागिने रोख रक्कम असा 97 हजारांचा माल हस्तगत केला आहे. यापैकी पपल्या महादेव पाटील हा फरारी झाला आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कसबे, हवलदार रवींद्र दवड, प्रवीण पाटील, घाडगे, खुबी कर, खिलारी, पाटील करत आहेत.