घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; 13 लाखाचा ऐवज हस्तगत

पुणे – घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून 12 घरफोडी व एक वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या गुन्हयातील 13 लाख 7 हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला रफिक हुसेन शेख(27,रा.सिल्वरनगर, हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाकडून सुरु होता. त्यांना सराईत गुन्हेगार शेख याने हा गुन्हा केल्याची खबर मिळाली. त्यानूसार त्याचा माग काढला असता, तो भारती विद्यापीठ येथील सर्प उद्यान येथे येणार असल्याची खबर मिळली.

खबरीनूसार युनिट दोनच्या पथकाने त्याला ऍक्‍टिव्हा स्कुटरसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली असता, त्याने गाडी चोरीची असल्याची कबुली दिली.त्याला अटक करुन पोलीस कोठडी घेण्यात आली.

या मध्ये त्याने भारती विद्यापीठ 3, सहकारनगर 2, मुंढवा 2, हडपसर, बिबवेवाडी, सिंहगड, वाकड, दिघी व कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रत्येकी 1 असे 12 घरफोडीचे व एक वाहनचोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 12 लाख 67 हजार रुपयांचे सोन्याचे व चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंग, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, उपनिरीक्षक आनंद पिंगळे, सहायक फौजदार यशवंत आंब्रे, पोलीस कर्मचारी किशोर वग्गु, चेतन गोरे, गजानन सोनुने, निखील जाधव, समिर पटेल, कादीर शेख, चंद्रकांत महाजन, विवेक जाधव, अजित फरांदे, उत्तम तारु व गोपाळ मदने यांच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.