पुणे – शहरात घरफोड्यांचे सुरूच आहे. कोंढवा, बिबवेवाडी, विश्रामबाग परिसरात सहा फ्लॅट फोडले. यामध्ये लाखोंचा ऐवज चोरुन नेला. एकीकडे घरफोडीचे गुन्हे वाढत असताना या गुन्ह्यांतील आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना अपयश येत आहे.
बिबवेवाडी येथील एका को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये राहणारे आकाश अनिल सांडभोर (वय 28) यांच्यासह सोसायटीतील तीन फ्लॅटमध्ये घरफोडीचा प्रयत्न झाला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर याच सोसायटीतील 10 व 11 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न केला. पण, चोरट्यांच्या हाताला काहीही लागले नाही. त्यामुळे जाताना त्यांनी पार्किंगमधील कारच्या काचा फोडून नुकसान केले.
कोंढवा परिसरातील रुक्मिणी अपार्टमेंटमध्ये राहणारे शेखर चंद्रकांत गोरडे (वय 68) यांचा बंद फ्लॅट फोडल्याचे समोर आले. तसेच, त्यांच परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या बंगल्यात चोरी करून लाखापेक्षा जास्त ऐवज लंपास केला. तसेच, सहानी सूजन पार्क येथील 81 क्रमांच्या बंगलोमध्ये घरफोडी केली.
राजेंद्रनगर येथील पीएमसी कॉलनी येथे एका घरामध्ये घरफोडीचा प्रकार सोमवारी रात्री घडला. याबाबत एका 35 वर्षीय महिलेने तक्रार दिली. त्यानुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्रीपर्यंत सुरू होते. तक्रारदार या घराच्या दुसऱ्या मजल्यावर झोपल्या होत्या. त्यावेळी खालच्या मजल्यावरील कपाटातील नऊ तोळे दागिने चोरून नेले.