बारामती – काटेवाडी (ता. बारामती) येथे रात्रीचे सुमारास चोरट्यांनी घरफोटी करून दागिने व रोख रक्कम मिळून तब्बल 1 लाख 95 हजाराच ऐवज चोरून नेला. शुक्रवारी (दि. 5) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काटेवाडी येथील राहिवासी महिला अरुणा भीमराव जाधव या नेहमीप्रमाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कामासाठी घराला कुलूप लावून गेल्या असता रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान, चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून ट्रंक मधील सोन्याचे गंठण, कर्णफुले, बोरमाळ असे सर्व सोन्याचे दागिने आणि रक्कम मिळून 1 लाख 95 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्याचबरोबर येथीलच संतोष सुभाष काटे यांच्या किराणा दुकानाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या दरवाजाचे कुलूप तोडून दीड हजार रुपये चोरट्याने लंपास केले.
कामावरून घरी परतल्यानंतर अरुणा जाधव यांना चोली झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार दिली. येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रात्री साडेबाराच्या नंतर हेल्मेट घातलेला एक व्यक्ती हातामध्ये टॉमी, बॅटरी घेऊन या ठिकाणी फिरत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये अरुणा भीमराव जाधव यांनी या अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. बारामती ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी अधिक तपास बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे करीत आहेत.