नेवासा : भर दुपारी घरात 17 वर्षिय एकटी मुलगी असल्याचे पाहून तीन अनोळखी चोरट्यांनी घरात प्रवेश करुन एकाने तीला चाकुचा धाक दाखवून गप्प बसवत तर दुसऱ्या दोघा चोरट्यांनी घरातील व कपाटातील सामानाची उचकापाचक करुन या मुलीला चोरट्यांनी सोन्याबाबत विचारपुस केली असता तीने घरात सोने नसल्याचे सांगितले.
त्यामुळे या चोरट्यांनी तीच्या घरामध्ये असलेले ३५ हजार रुपये रोख रक्कम घेवून तीला घरात कोंडून ठेवून बाहेरुन कडी लावून चोरट्यांनी तीच्या घराजवळ असलेल्या अशोक मुरलीधर आरगडे या तीच्या चुलत्याच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यानंतर त्यांच्या घरातील १ लाख ६० हजार रुपये किंमतीचे चार तोळे वजनाचे सोन्याचे दागीने तसेच शेजारीच असलेल्या बाळासाहेब चामुटे यांच्या घरातून १ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तसेत ४ हजार रुपये रोख रक्कम असा एकुण ३ लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज चोरी करुन चोरट्यांनी पोबारा केला.
ही घटना सौंदाळा (ता.नेवासा) येथे बुधवार (दि.१५) रोजी दिवसाढवळ्या घडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड घाबरट पसरली असून पुन्हा एकदा नेवासा पोलीसांच्या कार्यक्षेमतेबाबत जनतेत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की,सौंदाळा येथील कु.स्वप्नाली बाबासाहेब आरगडे (वय१७ वर्षे) रा.सौदाळा ता.नेवासा जि.अहिल्यानगर हिने नेवासा पोलीस ठाण्यात समक्ष दिलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे की,मी वरील ठिकाणी घरामध्ये आई रोहिणी,वडील बाबासाहेब आणि भाऊ बालाजी असे एकञ रहातो माझे आई-वडील बुधवार (दि.१५) रोजी सकाळी शेतामध्ये गेलेले असतांना मी सुद्धा सकाळी ७ वाजता शाळेत जावून पुन्हा ११ वाजता घरी माघारी आलेली होते व माझा भाऊ शाळेत गेलेला असल्यामुळे मी घरात एकटीच होते.
दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक तीन चोरट्यांनी आमच्या घरात प्रवेश केला त्यामुळे मी प्रचंड घाबरलेली होते. त्यातील एका चोरट्याने मला चाकू दाखवून गप्प बसण्याचे सांगितले तर दुसऱ्या दोघा जणांनी घरातील तसेच कपाटातील सामानाची उचकापाचक करुन मला घरातील सोन्याबाबत विचारपूस केली मी आमच्याकडे सोने नसल्याचे सांगितल्यावर ते तीन्ही चोरटे घराच्या बाहेर आमच्या घरातील ३५ हजार रुपये घेवून घरातून निघुन गेले व मी घरात असतांना बाहेरून कुलुप लावुन येथुन निघुन गेले.
त्यांतनर या मुलीने तीचा चुलत भाऊ अक्षय बापुसाहेब आरगडे यास फोन करून चोरीबाबत माहिती दिली असता त्याने मोठ-मोठ्याने आरडा ओरड केल्यानंतर त्यांच्या समोरून तीन इसम मोटार सायकलवरून पळुन गेल्याचे त्यांना दिसले त्यानंतर तिच्या भावाने घरी येवुन घराची बाहेरून कडी उघडली त्यानंतर आई-वडीलांना फोन करुन त्यांना चोरीची माहिती दिली.
आमच्या घरातील चोरीस गेलेल्या पैसेचे वर्णन पुढील प्रमाणे असे की,३५ रुपये रोख रक्कम त्यामध्ये ५०० – २०० आणि ११ रुपये दराच्या नोटा होत्या नंतर जवळच असलेल्या अशोक मुरलीधर आरगडे या मुलीच्या चुलत्याच्या बंद घराचे कुलूप तोडुन चोरट्यांनी घरातील १ लाख ६० हजार रुपये किंमतीचे चार तोळे वजनाचे सोन्याचे दागीने असा ऐवज चोरट्यांनी चोरी करुन पोबारा केला.
त्यानंतर बाळासाहेब रामनाथ चामुटे यांच्याही बंद घराचे कुलूप तोडुन चोरट्यांनी १ लाख २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व ४ हजार रुपये रोख असा एकुण तीन लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज दिवसाढवळ्या चोरी करुन चोरटे पसार झाले असल्यामुळे पोलीसांच्या कर्तव्याबाबत जनतेतून आश्चर्याबरोबरच चिडही व्यक्त केली जात आहे.
सुकृत दर्शनिय या मुलीने पाहीलेले चोरटे हे २५ ते ३० वर्ष वयोगटाचे असून त्यातील दोघा चोरट्यांनी पांढरे रंगाचे फुलबाह्यांचे शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स तर एका जणाने निळ्या रंगाचा चेक्स शर्ट तर फिकट निळ्या रंगाची जिन्स परिधान केलेली होती. या घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस आणि फिंगरप्रिंटवाल्यांनी हजेरी लावून ‘वराती मागून घोडे’ दामटण्याचा प्रकार करत चोरीच्या घटनेची माहिती घेतली. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे जनतेतून पोलीसांच्या कार्यपद्धतीबाबत आश्चर्याबरोबरच चिडही व्यक्त केली जात आहे.